अवकाळीचा कहर! विदर्भात पाऊस-गारपिटीचा इशारा

29 Mar 2026 21:24:33
नागपूर,
weather-news : राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 30 मार्चपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे नवे सत्र सुरू होणार असून, विदर्भासह अनेक भागांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
 
 

NEWS
 
 
हवामान अंदाजानुसार, 30 मार्च रोजी खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते.
 
31 मार्च रोजी पावसाचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता असली, तरी वातावरण अस्थिर राहणार असून ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर वादळी पाऊस आणि काही भागांत गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत, तसेच वादळी वारे आणि गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
तसेच, विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी झाडाखाली किंवा वीज उपकरणांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0