शेगाव :
Women's rally in Shegaon विश्वमांगल्य सभेच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय दोन दिवसीय मातृसंस्कार समागम उत्साहात आणि दिमाखात पार पडत असून, रविवारी (दि. 29 मार्च) समागमाच्या दुसऱ्या दिवशी शेगाव शहरात महिलांची भव्य रॅली काढण्यात आली. अग्रसेन भवन ते श्री गजानन महाराज मंदिर पर्यंत निघालेल्या या रॅलीत तब्बल 1600 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला.
रॅलीमध्ये चित्तथरारक प्रात्यक्षिके, युद्धकलेचे सादरीकरण, आखाडा प्रदर्शन, “वासुदेव आला” या पारंपरिक घोषणांनी वातावरण भारावून गेले. तसेच भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध देखावे सादर करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले.
Women's rally in Shegaon या वेळी देवनाथ पीठाचे आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश महामंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांनी शस्त्रपूजन केले.
“स्त्री हीच सृष्टीची आधारशिला” – जितेंद्रनाथ महाराज
समागमाचा भव्य प्रारंभ शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये करण्यात आला. उद्घाटन आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते झाले.
आपल्या प्रभावी मार्गदर्शनात महाराजांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की,
“स्त्री ही केवळ व्यक्ती नसून अन्नपूर्णा, दुर्गा, सरस्वती आणि भारतमातेचे साक्षात रूप आहे. संपूर्ण सृष्टीचा आधार स्त्रीच आहे.”
ते पुढे म्हणाले की,
“आई हीच संस्कारांची खरी जननी आहे. राजकारणी देश चालवतात, पण खरे राष्ट्रनिर्माते घरातील आईच असते.”
रघुवंश आणि भोसले वंशासारख्या महान परंपरांच्या निर्मितीमागे मातृशक्तीचे योगदान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्त्री सन्मानाची गरज अधोरेखित
महाराजांनी आधुनिक समाजात स्त्रीच्या सामर्थ्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबत चिंता व्यक्त करत, तिच्या सन्मानाची जाणीव समाजात पुन्हा जागवण्याची गरज व्यक्त केली.
समागमात मातृसंस्कार, कुटुंब व्यवस्थापन, संस्कृती संवर्धन आणि समाजनिर्मिती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत असून, परंपरा, प्रगती आणि परिपक्वता यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.
उपस्थिती आणि सत्कार
कार्यक्रमाला विदर्भातील विविध भागांतून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
प्रास्ताविक प्रांताध्यक्ष मधुरा लेंडे यांनी केले, तर संचालन चिंचोलकर मॅडम यांनी केले.
स्वागतपर भाषणात प्रांत संयोजिका डॉ. अपर्णाताई कुटे यांनी समागमाचा उद्देश स्पष्ट केला.
तसेच आचार्य जितेंद्रनाथ महाराज व डॉ. अपर्णाताई कुटे यांनी चित्रप्रदर्शनीची पाहणी केली.
वाशिम येथील आखाडा प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय विशेष योगदानाबद्दल भाजपा प्रदेश महामंत्री आमदार डॉ. संजय कुटे व डॉ. अपर्णाताई कुटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मातृशक्तीच्या जागृतीसाठी आणि संस्कारक्षम समाजनिर्मितीसाठी आयोजित हा मातृसंस्कार समागम शेगावमध्ये प्रेरणादायी ठरत असून, महिलांच्या सशक्त सहभागामुळे कार्यक्रमाला अभूतपूर्व यश लाभत आहे