कोलकाता,
170 policemen transferred in West Bengal निवडणूक आयोग ने पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रशासकीय निर्णय घेतले आहे. यामुळे राज्याच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या निर्णयानुसार राज्यातील तब्बल १७० पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोलकाता येथील ३१ ठाण्यांचा तसेच इतर जिल्ह्यांतील १४२ ठाण्यांचा समावेश आहे. राज्यात एकूण ५१६ पोलीस ठाणी असताना एका दिवसात एक तृतीयांशपेक्षा अधिक ठाण्यांतील प्रमुख अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याने हा निर्णय अत्यंत मोठा मानला जात आहे. या फेरबदलात भवानीपूर सारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मतदारसंघाचाही समावेश असून येथे ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात तीव्र सामना अपेक्षित आहे. त्यामुळे या बदल्यांमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय सूत्रांनी या निर्णयाला अभूतपूर्व म्हटले असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या यापूर्वी क्वचितच झाल्या असल्याचे सांगितले जात आहे.

११ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही हटवले
फक्त पोलीस ठाण्यांपुरतेच हे फेरबदल मर्यादित न राहता, आयोगाने ११ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही पदावरून हटवले आहे. त्यामुळे एकाच दिवशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची एकूण संख्या १८४ वर पोहोचली आहे. हा बदल राज्यातील बहुतांश भागात लागू करण्यात आला असून कूचबिहार, जलपाईगुडी, दार्जिलिंग, मालदा, दक्षिण दिनाजपूर, मुर्शिदाबाद, नादिया, उत्तर व दक्षिण २४ परगणा, हावडा, हुगळी, पूर्व व पश्चिम मेदनापूर, बीरभूम आणि बांकुरा या प्रमुख जिल्ह्यांमध्येही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दीर्घकाळ एका जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना हलवण्यात आले असून, सायबर गुन्हे, वाहतूक आणि इतर विशेष पथकांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यांचे नेतृत्व देण्यात आले आहे. काही विशिष्ट नियुक्त्यांमध्ये सुभब्रता नाथ यांना नंदीग्राम ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर विशेष कार्यबलातील सौमित्र बसू यांच्याकडे भवानीपूरचा कारभार सोपवण्यात आला आहे.
पूर्व मेदनापूर सर्वाधिक फेरबदल
कोलकात्यात सर्वाधिक म्हणजे ३१ बदल्या झाल्या असून, पूर्व मेदनापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. काँटाई, खेजुरी, चांदीपूर, हल्दिया, कोलाघाट, तामलुक, एग्रा आणि पतशपूर या भागांतील ठाण्यांमध्येही नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या बदलांचा परिणाम कोलकाता पोलीस दलातील विविध विभागांवरही झाला असून अनेक महत्त्वाच्या शाखांमध्ये नेतृत्वबदल करण्यात आले आहेत. दरम्यान, आयोगाने मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रामध्ये राज्य सरकारकडून आलेल्या प्रस्तावांची तपासणी करूनच या बदल्यांना मंजुरी दिल्याचे स्पष्ट केले आहे.