पाकिस्तान सुपर लीगमध्ये बॉल टेपिंग? VIDEO

30 Mar 2026 12:24:43
इस्लामाबाद,
Ball taping in Pakistan Super League? पाकिस्तान सुपर लीग मधील एका सामन्यात चेंडूशी छेडछाड झाल्याच्या संशयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स यांच्यातील हा सामना शेवटच्या षटकापर्यंत अत्यंत चुरशीचा ठरला, मात्र अखेरीस घडलेल्या घटनेने सामन्याचे चित्रच बदलून गेले. कराचीसमोर १२९ धावांचे लक्ष्य होते आणि अखेरच्या षटकात त्यांना १४ धावा आवश्यक होत्या. याच वेळी पहिला चेंडू टाकण्यापूर्वी पंचांच्या लक्षात चेंडूमध्ये काहीतरी बिघाड असल्याचा संशय आला. मैदानावर शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि फखर झमान यांच्यात चर्चा सुरू असताना पंचांनी चेंडू तपासला आणि तो बदलण्याचा निर्णय घेतला.
 
 

Pakistan Super League 
 
या निर्णयासोबतच लाहोर संघावर पाच धावांचा दंडही ठोठावण्यात आला, ज्यामुळे सामन्याचा तोल बिघडला. परिणामी, शेवटच्या षटकात कराचीसमोरचे लक्ष्य कमी झाले आणि त्यांनी सहज विजय मिळवला. या घटनेमुळे लाहोरला मोठा फटका बसला. सामन्यानंतर लाहोरचा कर्णधार शाहीन आफ्रिदी यांनी या वादावर संयत प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, चेंडूची स्थिती मुद्दाम बदलली गेली का, याबाबत सध्या कोणतीही स्पष्ट माहिती नाही. ड्रेसिंग रूममध्ये उपलब्ध चित्रफिती पाहूनच यावर पुढील भूमिका ठरवली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
 
 
 
 
 
 
दरम्यान, संघातील अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा यांनीही चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, संघातील कोणत्याही खेळाडूने चेंडूची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केलेला नाही. पंचांनी चेंडू का बदलला, याबाबत त्यांनाच विचारावे लागेल, असे त्यांनी सांगितले.रझा यांनी असेही म्हटले की, चेंडू कोरडा करण्यासाठी साधारणपणे जे प्रयत्न केले जातात, त्यावेळी पंचांनी काही सूचना दिल्या होत्या, मात्र कोणावर थेट आरोप करण्यात आलेला नाही. ठोस पुरावे समोर येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणामुळे सामन्याचा निकाल आणि पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0