वीर कोब्रा कमांडो दिनेश परतला मायभूमीत

30 Mar 2026 21:30:50
कमल छांगाणी,
धामणगाव रेल्वे, 
dinesh-raut : तब्बल एक महिन्याच्या उपचारानंतर सीआरपीएफचे वीर कोब्रा कमांडो दिनेश राऊत यांचे मायभूमी धामणगाव रेल्वे येथे आज आगमन झाले. सर्च ऑपरेशमध्ये पाय गमावलेले कमांडो राऊत घरी पोहोचताच आईच्या डोळ्यातील अश्रूंनी वाट मोकळी केली.
 
 
 
K
 
दिनेश राऊत हे सीआरपीएफमध्ये कार्यरत आहेत. झारखंडमधील चाईबासा येथील सारंडा जंगलात नक्षलवाद्यांविरोधात एक मोठे सर्च ऑपरेशन सुरू होते. सलग पाच दिवस आणि पाच रात्री हे जवान जंगलात तळ ठोकून होते. २० फेब्रुवारीला दिवसभर सर्चिंग केल्यानंतर २१ फेब्रुवारीला जवानांनी दोन आयईडी निकामी करण्यात यश मिळवले होते. दरम्यान दिनेश व त्यांचे सहकारी चालत असताना त्यांच्या मार्गात पेरलेल्या एका आयईडीचे सर्किट पूर्ण निकामी झाले नव्हते. जसा दिनेश राऊत यांचा पाय त्या जागेवर पडला, तसाच भीषण स्फोट झाला. या स्फोटात दिनेश यांचा पाय छिन्नविछिन्न झाला. अशा भीषण परिस्थितीतही धीर न सोडता, १० ते १२ किमी घनदाट जंगलातून सहकार्‍यांनी त्यांना स्ट्रेचरवरून हेलिपॅडपर्यंत नेले. तेथून त्यांना तातडीने दिल्लीला हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा एक पाय कापावा लागला.
 
 
 
तब्बल एक महिन्याने दिनेश राऊत आपल्या आईच्या भेटीसाठी धामणगाव रेल्वे येथे पोहोचले. यावेळी त्यांचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. झाडा गावचे माजी सरपंच विजय उगले, धामणगाव रेल्वे तालुका विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष सच्चिदानंद काळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या डोळ्यांत एकीकडे अश्रू होते तर दुसरीकडे त्यांच्या शौर्याबद्दलचा अभिमानही ह्रदयात होता.
 
 
//पिट्टूमुळे डोके बचावले
 
 
पाठीवरील साहित्य ठेवण्यास असलेल्या पिट्टूमुळे डोक्याला दुखापत झाली नाही स्फोट झाला त्यावेळी दिनेश व त्यांचे सहकारी जंगलात पायी चालत होते. जवानांच्या पाठीवर पिट्टू (अत्यावश्यक साहित्य ठेवण्यासाठी असलेले बॅग) होता. स्फोट होताच दिनेश हे फेकले गेले आणि पाठीच्या भारावर पडले. यावेळी पिट्टूमुळे त्यांना डोक्याला नाही. त्यांच्या पायाला दुखापत झाली.
 
 
//भारतमातेच्या सेवेसाठी कटिबद्ध
 
 
भारतमातेच्या सेवेसाठी मी जे केले, ते माझे कर्तव्यच आहे. यापुढेही माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी देशाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे’, हे उद्गार आहेत झारखंडच्या घनदाट सारंडा जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कायमस्वरुपी एक पाय गमावलेल्या सीआरपीएफचे वीर कोब्रा कमांडो दिनेश राऊत यांचे
Powered By Sangraha 9.0