वाशीम,
baras-yatra : जिल्ह्यातील मंगरुळनाथ तालुयातील ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या ईचा-नागी येथील श्री क्षेत्र महादेव संस्थान येथे सोमवार, ३० मार्च रोजी बारस उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला. यावेळी शेंडीने गाडे ओढण्याचा नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले ते तब्बल ५१ क्विंटल महाप्रसादाचे भव्य आयोजन. दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे वितरण सुरू झाले आणि संपूर्ण दिवस भाविकांनी मोठ्या प्रमाणावर याचा लाभ घेतला. हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविकांसाठी संस्थानच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले होते. महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणावर भोजन व्यवस्था करण्यात आली होती. थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्याची सुसज्ज व्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला होता. या सर्व व्यवस्थेसाठी सुमारे १००० महिला-पुरुष स्वयंसेवकांनी अहोरात्र सेवा बजावली, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात पार पडलेल्या या यात्रेला जिल्हाभरातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.
विशेष म्हणजे, सध्या गॅसची टंचाई असतानाही संस्थानच्या स्वयंसेवकांनी हार न मानता पारंपरिक इंधनाचा वापर करून महाप्रसाद तयार केला. हजारो भाविकांसाठी वेळेत आणि उत्कृष्ट दर्जाचा प्रसाद तयार करून त्यांनी सेवाभावाचे उत्तम उदाहरण घालून दिले. या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच, शेकडो वर्षांची परंपरा असलेली शेंडीने गाडे ओढण्याची नवस फेडण्याची प्रथा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ही आगळीवेगळी परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने जपली जात असल्याचे यावेळी दिसून आले.
या महाप्रसादा दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पाऊसामुळे गोंधळून न जात ईचा-नागी येथील नवयुवक स्वयंसेवकांनी आलेल्या भाविकांची पर्यायी व्यवस्था केली. गावकर्यांसह भाविकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.