शेतकर्‍यांची सुपीक जमीन उद्योगपतींना देऊ देणार नाही

30 Mar 2026 20:52:59
गडचिरोली, 
vijay-vadettiwar : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या उपजीविकेचा आधार असलेली सुपीक जमीन उद्योगपतींच्या घशात जाऊ देणार नाही, असा ठाम इशारा काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. चामोर्शी तालुक्यातील 14 गावांच्या जमीन अधिग्रहण प्रस्तावाला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध असताना सरकार हा प्रस्ताव पुढे रेटत असल्यास त्याविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
KJ
 
 
 
येथील विश्रामगृहात शेकडो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रपरिषदेत विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. जिल्ह्यात सुमारे 68 टक्के क्षेत्र जंगलव्याप्त असून केवळ 30 टक्के जमीन लोकवस्ती व शेतीसाठी उपलब्धआहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांची उपजीविकेची जमीन उद्योगांसाठी देण्याचा प्रयत्न हा अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
या पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदास मसराम, अ‍ॅड. राम मेश्राम, मनोहर पाटील पोरेटी, बंडू शनिवारे, अजय कंकडालवार आदींची उपस्थिती होती. शेतकर्‍यांना विस्थापित करून अन्याय करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
 
 
उद्योगांना आमचा विरोध नसल्याचे स्पष्ट करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, उद्योग उभारणीसाठी पडीत जमिनींचा वापर करावा आणि स्थानिकांना रोजगाराची हमी द्यावी. बल्लारपूर पेपर मिल अंतर्गत असलेल्या आष्टी पेपर मिलची जागा उद्योगासाठी वापरण्यास हरकत नसून, त्या ठिकाणी कार्यरत कामगारांना नवीन उद्योगात सामावून घ्यावे, अशीही त्यांनी मागणी केली.
 
 
दरम्यान, शेतकर्‍यांची जमीन भाडे तत्वावर घेण्याची भूमिका मांडणार्‍यांवर टीका करत त्यांनी ही भूमिका अत्यंत बेजबाबदार असल्याचे नमूद केले.
Powered By Sangraha 9.0