उमेश ताकसांडे,
वर्धा,
kerosene-tanker-proposed : ईराण-इस्त्राईल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगभरात सध्या इंधन तुटवड्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गॅस सिलेंडर तुटवड्यावर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिकांना केरोसीन वितरण करण्याचे निश्चित केले आहे. वर्धा जिल्ह्यासाठी ६ टँकर म्हणजे सुमारे ७२ हजार लिटर केरोसीन प्रस्तावित करण्यात आले आहे. पण, अद्यापही त्याचा पुरवठा जिल्ह्याला झालेला नाही. शासनाकडून केरोसीन वितरणाबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्ह्याला प्राप्त झाल्या नसून या सूचनांकडे पुरवठा विभागाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केरोसीन वितरणात ग्रामीण भागाला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ३ लाख २ हजार १४० शिधापत्रिकाधारक आहेत. यात ग्रामीण भागातील २ लाख २९ हजार ६०० तर शहरी भागातील ७२ हजार ५४३ शिधा पत्रिकाधारकांचा समावेश आहे. जिल्ह्याला पुरवठा करण्यात येणारा केरोसीनसाठा प्राधान्यक्रमाने ग्रामीण भागातील कुटुंबांना केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने घोषणा केल्यावर जिल्ह्यासाठी ६ टँकर म्हणजे ७२ हजार लिटर केरोसीन प्रस्तावित करण्यात आले आहे. पण, अद्यापही एक लिटरही केरोसीनचा पुरवठा झालेला नाही. जिल्ह्याला पुरवठा होणारे केरोसीन स्वस्त धान्य दुकान किंवा परवानाधारक केरोसीन विक्रेत्यांकडून वितरित केले जाणार आहे. गरज व मागणी नोंदविण्यात आल्यानंतरच केरोसीनचे वितरण केले जाणार आहे. पूर्वी गरजू व गरिबांना नाममात्र दरात केरोसीनचा पुरवठा केला जायचा. पण, सन २०१६-१७ मध्ये केरोसीन वितरण बंद करण्यात आले. आता ग्रामीण भागातील कुटुंबांना प्रती शिधापत्रिका ३ लिटर प्रमाणे केरोसीनचा पुरवठा केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. पण, केरोसीनची किंमत अद्यापही जाहीर झालेली नाही. यासह केरोसीन वितरणाबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या नाही.
ग्रामीण भागातील नागरिकांना सध्याच्या गॅस सिलेंडर तुटवड्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक कुटुंबांकडून मिळेल तेथून सरपण आणून चुलीवर जेवण शिजविले जात आहे. अशावेळी वेळीच जिल्ह्याला केरोसीनचा पुरवठा होऊन ग्रामीण भागातील कुटुंबांना रास्त दरात केरोसीन वितरित केल्यास त्यांना मोठा आधार मिळणार आहे.
एटीएममध्ये खडखडाट
युद्धाचा सर्वांनीच धसका घेतला आहे. आधी सिलेंडरची बोंब झाली. गॅस वितरकांकडे लांबचलांब रांगा लागल्या होत्या. ती परिस्थिती थोडी सुधारत नाही तोच पेट्रोल आणि डिझेलचा विषय चांगलाच पेटला. शनिवारपासुन सर्व सुरळीत होत नाहीच तोच आज सोमवारी सकाळपासुन शहरातील एसबीआयसह चार एटीएममधून पैसे येत नसल्याने शहरात पुन्हा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या संदर्भात जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चेतन शिरभाते यांच्यासोबत संपर्क साधला असता एटीएमची जबाबदारी खाजगी संस्थेकडे दिली आहे. सलग सुट्या आल्यामुळे काही ठिकाणी अडचण आली असेलही. परंतु, एटीएममध्ये पैसे आहेत. कोणीही घाबरून जाऊ नये, असे त्यांनी तरुण भारत प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.