देवळीत महाराष्ट्र केसरीचा उद्यापासुन थरार

30 Mar 2026 21:10:33
देवळी, 
maharashtra-kesaris : माजी खासदार रामदास तडस यांच्या वाढदिवसानिमित्त देवळीत ग्रीकोरमन महाराष्ट्र केसरी किताब राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार ३१ रोजी होणार असून देवळी नगरी कुस्तीचा जल्लोषात रंगण्यास सज्ज झाले आहे. भारतीय कुस्तिगीर संघ संलग्न महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वर्धा जिल्हा कुस्तिगीर संघ व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळीच्या संयुत वतीने ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान ग्रीकोरोमन प्रकारातील ही प्रतिष्ठेची स्पर्धा रंगणार आहे.
 
 
K
 
 
 
खा. रामदास तडस इनडोअर स्टेडियम देवळी स्व. दत्ता मेघे क्रीडानगरी या स्पर्धेसाठी आकर्षक सजली असून स्पर्धा दोन मॅटवर खेळविण्यात येणार आहेत. स्टेडियममध्ये आधुनिक सुविधा उभारण्यात आल्या असून प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था, शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि सामन्यांचा थरार पाहण्यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीनचीही व्यवस्थाही करण्यात आली आहे.
 
 
 
या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील तब्बल ४२ संघ आणि सुमारे ४०० मल्लांचे आगमन देवळीत झाले असून उद्घाटनापूर्वी सहभागी सर्व मल्ल आपापल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत शहरातून मिरवणूक काढून स्टेडियमवर पोहोचून स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ३१ रोजी सायंकाळी ७ वाजता माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार राहणार असून, स्वागताध्यक्ष आ. राजेश बकाने, स्पर्धेचे आयोजक माजी खा. रामदास तडस, आ. दादाराव केचे, नगराध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
 
माजी खासदार रामदास तडस स्वतः स्पर्धा स्थळी उपस्थित राहून तयारीचा आढावा घेत आहेत. आ. बकाने यांनीही नियोजनाची पाहणी केली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाकरिता विलास जोशी, उमेश कामडी, रवींद्र करोटकर, रितेश लोखंडे, शुभांगी कुर्जेकर, सौरभ कडू, अंकित टेकाडे, शुभम तरेकर, प्रकाश करोटकर, विजय गोमासे आदी परिश्रम घेत आहेत.
Powered By Sangraha 9.0