नागपूर
MSBHSE विद्यार्थ्यांसाठी कागदपत्रांची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एमएसबीएचएसएसई) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इयत्ता १० वी (एसएससी) आणि इयत्ता १२ वी (एचएससी) परीक्षांसाठी यापुढे ‘गुणपत्रिका-कम-उत्तीर्ण प्रमाणपत्र’ असे एकत्रित दस्तऐवज देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे निकालानंतर स्वतंत्रपणे प्रमाणपत्राची वाट पाहण्याची गरज राहणार नाही.
पूर्वी विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच गुणपत्रिका मिळत असे; मात्र उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळण्यासाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागत होती. नवीन प्रणालीमुळे ही दोन्ही कागदपत्रे एकाच स्वरूपात आणि एकाच वेळी उपलब्ध होतील. त्यामुळे वेळेची बचत होऊन शैक्षणिक व प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे.या नव्या दस्तऐवजात सुरक्षेच्या दृष्टीने प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. गुणपत्रिकेवर विद्यार्थ्याचा छायाचित्र मुद्रित असेल, तसेच क्युआर कोडद्वारे डिजिटल पडताळणीची सुविधा उपलब्ध असेल. या क्युआर कोडच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्याचा संपूर्ण शैक्षणिक तपशील त्वरित पाहता येणार असल्याने दस्तऐवजाची विश्वसनीयता वाढणार आहे.
याशिवाय, मंडळाने विद्यार्थ्यांच्या नावांच्या स्वरूपातही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे विद्यार्थ्यांची नावे आधार कार्डवरील स्वरूपाशी सुसंगत ठेवली जाणार आहेत. पूर्वी वापरले जाणारे आडनाव-नाव-वडिलांचे नाव हा क्रम बंद करण्यात येणार आहे. या बदलामुळे अधिकृत नोंदींमध्ये एकसंधता आणि सुसूत्रता येईल.एकूणच, एसएससी आणि एचएससी निकाल २०२६ ची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही नवीन प्रणाली मोठा दिलासा ठरणार असून, एकाच कागदात सर्व शैक्षणिक तपशील उपलब्ध होण्याची सोय होणार आहे.