७४ अतिरिक्त बसांची घोषणा...

30 Mar 2026 15:49:31
पुणे,
MSRTC उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने विशेष तयारी सुरू केली आहे. यंदाच्या सुट्टीच्या काळात प्रवाशांना सुलभ आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे विभागातून ७४ अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बसेस १४ एप्रिल ते १० जून २०२६ या कालावधीत प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत.
 

MSRTC Pune extra buses summer 2026, Pune ST bus additional services, 
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, विविध क्षेत्रातील कर्मचारी तसेच औद्योगिक कामगार मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जात असतात. त्यामुळे एसटी स्थानकांवर मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दरवर्षी पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त बससेवा सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अतिरिक्त बस मुख्यतः अक्कलकोट, तासगाव, कोल्हापूर, पंढरपूर, जळगाव, कळण, सप्तशृंगी, अकोला, अहमदपूर आणि गोंदवले या मार्गांवर सोडण्यात येणार आहेत.पुणे एसटी विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी सांगितले की, प्रवाशांनी एसटीच्या या विशेष सेवेचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित व नियोजित प्रवास करावा. या निर्णयामुळे सुट्ट्यांतील गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुणे विभागात ‘राजमाता जिजाऊ’ या आधुनिक शटल बस सेवेचीही सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी ही बस पुण्यात दाखल झाली असून स्वारगेट ते बारामती या मार्गावर तिचे संचालन सुरू करण्यात आले आहे. ५६ आसनक्षमतेची ही बस राज्यातील अशा प्रकारची पहिली सेवा असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत पुणे विभागात आणखी २५० अशा बस दाखल होणार असल्याची माहितीही धनराळे यांनी दिली.या नव्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. बसमध्ये एकूण पाच सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, सार्वजनिक घोषणा प्रणाली तसेच इलेक्ट्रॉनिक मार्गदर्शक फलक यांचा समावेश आहे. पारंपरिक बसेसपेक्षा अधिक आसन क्षमता असल्याने प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.एसटीच्या या उपक्रमांमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच शहरांमधील वाहतुकीवरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. उन्हाळी हंगामात प्रवाशांना दिलासा देणारी ही सुविधा ठरणार असल्याचे चित्र आहे.
Powered By Sangraha 9.0