नागपूर,
Nagpur University विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठने ‘विकिरण सुरक्षा आणि अणुऊर्जा’ या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून ‘शांती विधेयका’ला मंजुरी मिळाल्यानंतर अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी सहभाग वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागाने हा अभ्यासक्रम विकसित केला असून, तो बीएससी आणि एमएससीच्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. येत्या पाच वर्षांत अणुऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांना उद्योगाच्या बदलत्या गरजांसाठी सक्षम बनवणे हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा सात दिवसांचा अभ्यासक्रम Nagpur University विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. भाभा अणुसंशोधन केंद्रचे माजी शास्त्रज्ञ डॉ. एस. मुरली यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी किरणोत्सर्गाचे स्रोत, शोध तंत्रज्ञान, मापन उपकरणे, जैविक परिणाम, सुरक्षा तत्त्वे आणि किरणोत्सर्गी कचरा व्यवस्थापन या विषयांवर सखोल माहिती दिली.अभ्यासक्रमात सैद्धांतिक ज्ञानासोबतच व्यावहारिक प्रशिक्षणालाही महत्त्व देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये किरणोत्सर्गी तंत्रज्ञानाच्या सुरक्षित वापराबाबत जागरूकता आणि आवश्यक कौशल्ये विकसित झाली. पहिल्या तुकडीत ७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ५१ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.विशेष म्हणजे, काही अभिमत विद्यापीठांतील प्राध्यापकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. हा अभ्यासक्रम आता प्रत्येक सत्रात नियमितपणे आयोजित केला जाणार असून, सहभाग विनामूल्य असला तरी परीक्षा आणि प्रमाणपत्रासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.