विधान परिषदेतून नितीश कुमारांचा राजीनामा

30 Mar 2026 11:52:21
पाटणा,
Nitish Kumar's resignation बिहारमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधान परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, या निर्णयानंतरही ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या पावलामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून पुढील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. नितीश कुमार यांची नुकतीच राज्यसभेसाठी निवड झाली होती. घटनात्मक नियमांनुसार, एका व्यक्तीने एकाच वेळी दोन सभागृहांचे सदस्यत्व ठेवता येत नसल्याने त्यांना ३० मार्चपूर्वी विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. त्यानुसार त्यांनी आपला राजीनामा सादर केला असून विधान परिषदेचे अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांनी तो स्वीकारल्याची माहिती दिली आहे.
 

सर्फ  
 
 
सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पक्षातील सदस्य संजय कुमार सिंह गांधी यांनी हा राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भावना व्यक्त केल्या आहेत. मंत्री अशोक चौधरी यांनी नितीश कुमार यांना मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून संबोधले, तर विजय कुमार चौधरी यांनी घटनात्मक प्रक्रियेचा भाग म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले. नितीश कुमार हे २००६ पासून विधान परिषदेचे सदस्य होते. ते २०२४ मध्ये पुन्हा एकदा सदस्य म्हणून निवडून आले होते आणि त्यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत होता. मात्र, १६ मार्च २०२६ रोजी राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर त्यांनी नियमानुसार परिषद सदस्यपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर ते आता चारही सभागृहांमध्ये काम केलेल्या नेत्यांमध्ये सामील झाले आहेत. यापूर्वी त्यांनी १९८५ मध्ये हरनौत मतदारसंघातून प्रथमच आमदार म्हणून प्रवेश केला होता आणि १९८९ मध्ये लोकसभेतही निवडून गेले होते. रम्यान, या घडामोडींमध्ये काही राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू आहेत. मोकामा मतदारसंघातील आमदार अनंत सिंह यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन नितीश कुमार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद घेतल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षातील अनेकांना खंत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Powered By Sangraha 9.0