एमआयएम व काँग्रेसच्या मागणीला महायुतीचा विरोध

30 Mar 2026 21:33:35
अमरावती, 
aimim-congress-mahayuti : महानगरपालिकेच्या सोमवारच्या अर्थसंकल्पीय आमसभेत एमआयएमच्या नगरसेवकांनी शहराच्या पश्चिम भागाच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी करत सभातींच्या आसनाजवळ येऊन आंदोलन सुरू केले. त्यांच्या या मागणीला काँग्रेसने बळ दिले. दोघांकडून झालेल्या या मागणीला सत्ताधारी महायुतीने प्रचंड विरोध केल्याने सभागृहात काहीकाळ गोंधळ झाला होता.
 
 
SDF
 
महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेत व मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या उपस्थित अर्थसंकल्पीय आमसभा आयोजित करण्यात आली होती. त्यात अर्थसंकल्पातल्या विविध तरतुदींवरची चर्चा शेवटच्या टप्प्यात असताना एमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी आम्ही ज्या भागाचे प्रतिनिधीत्व करतो, त्या भागाचा अजिबात विकास झालेला नाही. तेथील विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची विशेष तरतुद करण्याची मागणी करत ते सभापतींच्या आसनासमोर आले. त्यांनी मागणीच्या समर्थनात नारेबाजी सुरू केली. त्यांच्या मागणीचे काँग्रेसचे गटनेता बबलू शेखावत यांनी समर्थन केले व निधी देण्याची सूचना केली. सभागृहनेता चेतन गांवडे यांनी या मागणीला तीव्र विरोध केला. सत्ताधारी महायुतीचे अन्य नगरसेवक देखीख प्रचंड आक्रमक झाले. नियमानुसार असा विशेष निधी देता येत नाही. उद्या प्रत्येकच भागातले नगरसेवक विशेष निधीची मागणी करतील. प्रत्येकाची मागणी मान्य करणे शक्य होणार नाही. शेवटी विरोधी पक्षनेता विलास इंगोले यांनी पश्चिम क्षेत्रातल्या विकासाच्या ज्या अडचणी आहेत, त्यावर सभापतींनी बैठक घेऊन नगरसेवकांचे समाधान करावे व निधी द्यावा, अशी सूचना केली. ती मान्य झाल्यानंतर गोंधळ थांबला. या शिवाय कोणार्क कंपनीच्या कामाचे मुल्यमापन करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा विषय चर्चेला आला. सदर समितीची बैठक ४ एप्रिलला होणार आहे. अर्थसंकल्पातल्या अन्य तरतुदींवरही चर्चा झाली.
 
 
//पदाधिकारी व नगरसेवक निधीत वाढ
 
 
महापौरचा निधी दिड कोटी, उपमहापौरांचा १ कोटी, स्थायी समिती सभापती, पक्षनेता, विरोधी पक्षनेता यांचा प्रत्येकी ७५ लाख, गटनेत्यांचा प्रत्येकी ४० लाख, झोन सभापतींचा प्रत्येकी २० लाख निधी करण्यात आला आहे. प्रत्येक नगरसेवकाला वार्ड विकास व स्वेच्छा निधी आता ४० लाख मिळणार आहे. याचाच अर्थ प्रत्येक प्रभागाला आता विकासासाठी १ कोटी ६० लाखाचा निधी मिळेल. महापौर महोत्सवासाठी ३५ लाख, नाट्य - कला - क्रिडा महोत्सवासाठी ५० लाख देण्यात येणार आहे.
 
मनपाचा अर्थसंकल्प ८७६.२६ कोटीचा
 
 
महापालिकेचा २०२६-२७ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ८७६.२६ कोटीचा आहे. त्यात एकूण प्रस्तावित खर्च ७११.६ कोटी दर्शविण्यात आला आहे. वर्षा अखेर १६५.२० कोटी शिल्लक राहील, असा अंदाज आहे. स्थायीचे सभापती अविनाश मार्डीकर यांनी हा अर्थसंकल्प सभागृहात मांडला. सविस्तर चर्चा आणि काही तरतुदींमध्ये बदल सूचवत सर्व सदस्यांनी या अर्थसंकल्पाला मान्यता दिली.
Powered By Sangraha 9.0