डेहराडून,
Retired Brigadier murdered डेहराडून येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. निवृत्त ब्रिगेडियर व्ही. के. जोशी यांची गोळी लागून हत्या झाली आहे. जोहरीगाव परिसरात ही घटना घडली, ते सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले असताना अचानक हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार वाद सुरू होता. परिस्थिती चिघळत गेल्याने त्याचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले आणि त्याच दरम्यान गोळीबार झाला. यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या जोशी यांना ही गोळी लागली.
घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून एका निरपराध व्यक्तीचा जीव विद्यार्थ्यांमधील वादातून गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार विद्यार्थ्यांमधील वादातून घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, जोशी यांच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिस प्रशासनानेही लवकरच आरोपींना पकडण्याचा विश्वास व्यक्त केला असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.