मुंबई,
Rohit's stormy innings आयपीएलच्या १९व्या हंगामात खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून शानदार विजय मिळवला. वानखेडे मैदानावर रंगलेल्या या सामन्यात धावांचा अक्षरशः पाऊस पडला आणि प्रेक्षकांना चुरशीची लढत पाहायला मिळाली.प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने अजिंक्य रहाणे, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग आणि फिन ॲलन यांच्या दमदार खेळीच्या जोरावर २२० पेक्षा अधिक धावा उभारल्या. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवातही तितकीच आक्रमक झाली. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर तुटून पडत अवघ्या ७१ चेंडूत १४८ धावांची भागीदारी करत विजयाचा मजबूत पाया रचला.
रोहित शर्माने केवळ ३८ चेंडूत ७८ धावांची तुफानी खेळी साकारत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्याच्या या धडाकेबाज फलंदाजीला रायन रिकेल्टननेही ८१ धावांची प्रभावी साथ दिली. या दोघांच्या कामगिरीमुळे मुंबईने हे मोठे लक्ष्य सहज गाठले.
सामन्यानंतर संघाच्या ड्रसिंग रूममध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी स्वतः येऊन खेळाडूंचे अभिनंदन केले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली आणि त्याच्या जर्सीवर विशेष मानचिन्ह लावून त्याचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी शेर्फेन रदरफोर्डलाही गौरवण्यात आले. या वेळी रोहित शर्माने सहकाऱ्यांना उद्देशून प्रेरणादायी शब्दांत संदेश दिला. अनेक वर्षांपासून ज्या यशाची अपेक्षा होती, तो क्षण अखेर साध्य झाल्याचे सांगत त्याने सर्वांनी अभिमानाने पुढे वाटचाल करत राहण्याचे आवाहन केले. संघाच्या या विजयानंतर चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.