‘संघ गंगा के तीन भगीरथ’ नाटकाला अहेरीत उत्स्फूर्त प्रतिसाद

30 Mar 2026 19:10:24
अहेरी, 
sangh-ganga-ke-tin-bhagirath-drama : येथील वासवी फंक्शन हॉलमध्ये रविवारी पार पडलेल्या ‘संघ गंगा के तीन भगीरथ’ या नाटकाच्या प्रयोगाला अहेरीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. एकल अभियान अंचल आलापल्लीच्यावतीने आणि पुणे-नागपूरच्या ‘ताराराणी फाऊंडेशन’ प्रस्तुत या शताब्दी संघ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथम तीन सरसंघचालकांच्या जीवन चरित्रावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणार्‍या या नाटकाचे अहेरीकरांनी भरभरून कौतुक केले. या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. मान्यवरांची मांदियाळी आणि गच्च भरलेले सभागृह कार्यक्रमाला अहेरी परिसरातील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिग्गज आणि विविध संघटनांचे प्रमुख, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक आवर्जून उपस्थित होते.
 
 
 
GAD
 
 
 
नाटकाची उत्सुकता इतकी होती की, प्रयोग सुरू होण्यापूर्वीच वासवी सभागृह प्रेक्षकांनी गच्च भरून गेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच्या सुरुवातीच्या काळातील ध्येयधोरणे आणि पहिल्या तीन सरसंघचालकांचा खडतर प्रवास कलाकारांनी अत्यंत प्रभावीपणे रंगमंचावर जिवंत केला.
 
 
‘संघ गंगा के तीन भगीरथ’ या नाटकाचे लेखन श्रीधर गाडगे यांनी केले असून, दिग्दर्शन संजय पेंडसे यांनी केले आहे. कलाकारांच्या कसदार अभिनयाने आणि उत्तम संवादांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अहेरीतील नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात नाटकाला भरभरून दाद दिली. नाटक संपल्यानंतर सर्वच स्तरातून कलाकारांचे आणि आयोजकांचे मोठे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकल अभियान अंचल आलापल्ली परिवार, अहेरीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0