इसापूर येथील 6 मागण्यासाठी वीरूगिरी
दिग्रस,
तालुक्यातील इसापूर येथील ‘टॉवरमॅन’ नावाने परिचित Shyam Maroti Gaikwad श्याम मारोती गायकवाड याने आपल्या 6 मागण्यासाठी सोमवार, 30 मार्चला आपल्या नेहमीच्याच शैलीत टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा ‘फॉर्म्युला’ अवलंबल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. श्याम गायकवाड याने इसापूर येथील 6 मागण्यांबाबत मुख्यमंत्री, मानवी हक्क आयोग, पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन दिले.
मात्र अंमलबजावणी होत नसल्याने अखेर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बीएसएनएल कार्यालयाच्या टॉवरवर तो चढला आणि तेथे उपोषण सुरू केले. या तापत्या उन्हात याच्या वीरूगिरीने प्रशासनासमोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे. श्याम सकाळी नेमका कधी चढला हे कोणालाच माहीत नाही. श्यामने टॉवरवर जाताना आपल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एपीजी डॉ. अब्दुल कलाम, वसंतराव नाईक, अण्णाभाऊ साठे व बिरसा मुंडा यांचे फोटो नेले होते. या फोटोंना हार घालून व तिरंगा ध्वज लावून त्याने टॉवरवर उपोषण सुरू केले आहे.
इसापूर येथे प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण न करणाèया सचिवावर कारवाई करा, ग्रामपंचायत अंतर्गत नमुना 8 चे नोंद रजिस्टर चोरी गेल्याने कारवाई करा, इसापूर गावाचा नकाशा नसल्याने येथील घरे अधिकृत नसल्याने याबाबत चौकशी करा, या त्याच्या मागण्या आहेत. तसेच इसापूरच्या मालमत्ता 553 वर तिघांचे नाव चढल्याबाबत कारवाई करा, इसापूर गावाची जनगणना कोणत्या साली झाली याची माहिती द्या आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या म्हणण्यानुसार सरकार योग्य काम करीत आहेत, तर येथील परिस्थिती स्वतः येऊन पहा, अशा 6 मागण्यांसाठी आपला जीव धोक्यात टाकून श्याम गायकवाड टॉवरवर चढून उपोषणाला बसला आहे.
श्यामची वीरूगिरी सातव्यांदा
Shyam Maroti Gaikwad यापूर्वी आपल्या मागण्यांसाठी श्याम गायकवाड हा तब्बल सहा वेळा टॉवरवर चढला आहे. पोलिस ठाण्याच्या टॉवरवर दोन वेळा, तहसील कार्यालय टॉवरवर दोन वेळा, पंचायत समिती आवारातील झाडावर एकदा, मुंबईला जाऊन दिशादर्शक फलकावर एकदा अशी त्याची सहावेळा वीरूगिरी प्रशासनाने अनुभवली आहे. आता बीएसएनएल टॉवरवर चढण्याची ही सातवी वेळ आहे. मधल्या काळात त्याच्या टॉवरवर चढण्याच्या धाकाने पोलिस ठाण्यातील व तहसील कार्यालयातील टॉवरला चक्क टिनपत्रे लावण्यात आली आहेत. त्यामुळेच आता त्याने बीएसएनएलचे टॉवर निवडले असून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्याने सांगितले.