जो स्वप्न बघत नाही, तो प्रगती करीत नाही : आ. सिद्धार्थ खरात

30 Mar 2026 21:03:20
रिसोड, 
siddharth-kharat : नवतरुणांची अनेक स्वप्ने असतात, पालकही स्वप्न पाहतात, पण स्वप्नांना दिशा आणि प्रयत्नवादाची जोड असेल तरच ध्येयशिखर साध्य होऊ शकते. समस्या तर प्रत्येकालाच आहेत पण त्यांची रडगाणे न गाता प्रगती करतो तोच खरा मानव असतो असे परखड विचार मेहकर -लोणार मतदार संघाचे आमदार तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अधिसभा सदस्य सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केले.
 
 
J
 
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या निर्देशावरून, जीवन विकास शिक्षण संस्थाध्यक्ष बाबाराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्राचार्य डॉ. मधुकर गायकवाड आणि प्रा. डॉ. श्रीहरी पितळे यांचे नियोजनातून स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या उन्हाळी २०२५ च्या पदवीदान समारोह आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून, एका खेडेगावातून पोलिस निरीक्षक, तहसीलदार, मंत्रालयातील कक्ष अधिकारी, सहसचिव असा प्रवास करीत आता आपण आमदार कसे झालो याचे गमक त्यांनी उलगडवून सांगितले.
 
 
जीवन विकास शिक्षण संस्थेचे सचिव अमित खडसे, बुलढाणा जिल्हा परिषदेचे सदस्य आशिष रहाटे, जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ. जे. बी. देव्हडे, राज्य काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शैलेश बावस्कर, विशाल खडसे यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडला. यावेळी ११७ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र तसेच ४२ गुणवंत पारितोषिक वितरित करण्यात आले. दिव्या गोल्हारे हिने विद्यापीठातून इतिहास विषयाचे सुवर्णपदक आणि अर्थशास्त्र विषयाचे रौप्यपदक जिंकल्याबद्दल महाविद्यालयाने तिचा विशेष सन्मान केला. प्रास्ताविकातून प्राचार्य गायकवाड यांनी भूमिका विशद केली. सर्व मान्यवरांनी समयोचित विचार मांडले.
 
 
जीवन विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबाराव पाटील खडसे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये जिद्दीचा दिवा पेटविण्याचे आवाहन केले. जुनी पिढी कोणत्याही सोयीसुविधा आणि दिशादर्शन नसताना केवळ प्रगतीच्या तळमळीमुळे यशस्वी झाल्याचे दिसून येते पण आता मात्र मुलांमध्ये आत्मप्रगतीची ती तळमळ अभावाने दिसते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठ गीताने समारंभाचा प्रारंभ झाला तर राष्ट्रगीताने शेवट झाला. संचलन डॉ.श्रीहरी पितळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. केशव कोकाटे यांनी केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, कार्यालयीन कर्मचारी, पदवीकांक्षी विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता.
Powered By Sangraha 9.0