अस्पृश्यतेची भावना समाप्त करण्याचे आव्हान

30 Mar 2026 21:15:36
-सुनील किटकरू यांचे प्रतिपादन
-महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी
-विवेक विचार मंचचे आयोजन

नागपूर, 
रुढीपरंपरेत जगणाऱ्या लोकांच्या मनामधून अस्पृश्यतेची भावना समाप्त करण्याचे, परिवर्तनाचे फार मोठे आव्हान आजच्या पिढीपुढे आहे, असे प्रतिपादन विवेक विचार मंच विदर्भ संयोजक Sunil Kitkaru सुनील किटकरू यांनी केले. महाडच्या चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त विवेक विचार मंचद्वारे व्याख्यान आयोजित करण्यात आले. आंबेडकरी तत्त्वज्ञान अभ्यासक देवराव सवाईथूल, गायिका प्रतिभा मनोहर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
 
 
vichar
 
सुनील किटकरू म्हणाले की, चवदार तळे सत्याग्रह
समानतेच्या मानवी हक्काचा आग्रह होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो दलित बांधवांनी ओंजळीने पाणी पिऊन जगाला माणुसकीच्या अस्तित्वाची, समतेची शिकवण दिली. अस्पृश्यतेची शृंखला तोडून मानवी अधिकारांच्या लढ्याचे दर्शन घडविले. हा लढा केवळ पाण्यासाठी नव्हता. मानवी मूलभूत हक्कासाठी व हिंदू धर्म सुधारण्यासाठी होता. विचारात परिवर्तन झाल्याशिवाय आचरणात परिवर्तन होत नसल्याने त्यांनी वेळोवेळी हिंदू संघटनाशी सल्लामसलत करून मानवमुक्तीचा लढा यशस्वी केला. शंभर वर्षानंतर आजसुद्धा सशक्तस्वाभिमानी व समतायुक्त समाज निर्मितीसाठी जागृती निर्माण करून अस्पृश्यतेची भावना समाप्त करण्याचे, परिवर्तनाचे फार मोठे आव्हान आहे.
 
 
 
Sunil Kitkaru  देवराव सवाईथूल म्हणाले की, तलाव व त्यातील पाणी सृष्टीचे, निसर्गाचे, सर्वांचे, समान हक्काचं. तरी त्यात भेदभाव होता. बाबासाहेबांनी क्रांतीची सुरुवात करून ठणकावून प्रश्न केला की, आम्हीही माणसे आहोत. माणूस माणसाला पाणी नाकारतो ही कसली नैतिकता? समानता, स्वातंत्र्य व बंधुता हाच आपला खरा धर्म, असा संदेश बाबासाहेबांनी सत्याग्रहाच्या निमित्ताने प्रत्येक भारतीयाला दिला. जगाला या घटनेची दखल घ्यावी लागली. हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
प्रतिभा मनोहर यांनी ‘माझ्या भिमाने चवदार तळ्याचे पाणी पाजले..’ गीत गाऊन उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. राजू साळवे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या आंदोलनात सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीळकंठ सहस्त्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे यांचाही सहभाग होता. विश्वजित सिंह, सचिन जांभुळकर, चारुदत्त सहजे, पवन डहाके, सुरेश विंचुरकर, भाग्यश्री दिवाण यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0