चेन्नई,
Thalapathy Vijay nominates driver's son तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू वेत्री कळघमचे प्रमुख थलपथी विजय यांनी उमेदवारांची घोषणा केली. या घोषणेदरम्यान मंचावर घडलेला एक प्रसंग सर्वांच्या भावना हेलावून टाकणारा ठरला. विजय यांनी आपल्या पक्षाकडून विरुगंबक्कम मतदारसंघासाठी सबरीनाथन याचे नाव जाहीर केले. विशेष म्हणजे, सबरीनाथनचे वडील राजेंद्रन हे पूर्वी विजय यांचे चालक म्हणून काम करत होते आणि सध्या ते त्यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. मुलाचे नाव उमेदवार म्हणून जाहीर होताच, सबरीनाथन आणि त्याचे वडील दोघेही मंचावरच भावूक झाले. सबरीनाथनने विजय यांच्या पायांना स्पर्श करून त्यांना मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. हा भावनिक क्षण पाहून विजय स्वतः पुढे सरसावले आणि त्यांनी त्याचे अश्रू पुसत त्याला धीर दिला. राजेंद्रनही या प्रसंगी अत्यंत भावूक झाल्याचे दिसून आले.

दीर्घकाळ प्रामाणिकपणे सेवा बजावल्यामुळे राजेंद्रन यांना विजय यांचा विश्वास संपादन करता आला होता. त्यांच्या या नात्याचीच पुढची पायरी म्हणून आता त्यांच्या मुलाला राजकारणात संधी मिळाल्याचे मानले जात आहे. विजय यांनीही अशा व्यक्तींना संधी दिली असल्याचे सांगितले जे सामान्य लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या बाजूने उभे राहतील.या वेळी विजय यांनी आपल्या पक्षाचा कार्यक्रमही स्पष्ट केला. राज्याला अमली पदार्थांपासून मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला तसेच बारावीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर तारणमुक्त कर्जाची हमी देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, विजय स्वतःही दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाले आहे. चेन्नईतील पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या ठिकाणांहून ते उमेदवारी करणार आहेत. या घोषणेमुळे तामिळनाडूच्या राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले असून विजय यांच्या या निर्णयाची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे.