ऐतिहासिक काटा कुस्ती महादंगल दिमाखात
पहिलवान विजय शिंदे यांना मानाची गदा
महिला गटात अनुष्का गादेकर विजेती
वणी,
Wrestling after 16 years येथील जत्रा मैदानात आमदार केसरी काटा कुस्ती महादंगलचे भव्य आयोजन करण्यात आले. तब्बल 16 वर्षांनंतर वणीच्या मातीतील कुस्ती महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेचा गौरव वाढवणारी ‘ऐतिहासिक काटा कुस्ती महादंगल’ वणी शहरातील स्व. सुनंदा मधुकर उंबरकर स्टेडियमवर मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडली. या दिमाखदार स्पर्धेचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगर परिषद अध्यक्ष विद्या आत्राम, विजय मुकेवार, नप उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, बांधकाम सभापती लवलेश लाल, आरोग्य सभापती अनिल चिंडालिया यांच्यासह अनेक नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
पुरुषांच्या चुरशीच्या गटात वाशिमच्या पहिलवान विजय शिंदे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला व मानाची गदा जिंकली. अंतिम लढतीत पुण्याच्या अक्षय शेळके यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली व उपविजेतेपद मिळवले. महिला गटात पहिलवान अनुष्का पांडुरंग गादेकर हिने जिद्द व ताकदीच्या जोरावर विजेतेपद पटकावत महिला कुस्तीतील आपले वर्चस्व सिद्ध केले.
Wrestling after 16 years उद्घाटन कार्यक्रमात बोलताना माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी बाहेरून आलेल्या सर्व पराक्रमी पहिलवानांचे स्वागत करत कुस्ती ही केवळ खेळ नसून आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. वणीच्या मातीत अजूनही ताकद आणि परंपरेचे वैभव जिवंत असल्याचे त्यांनी नमूद केले. या महादंगलीत महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नामांकित मल्लांनी आपल्या दमदार खेळाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शनिवार, 28 मार्च रोजी झालेल्या या स्पर्धेत मनसे नेते राजू उंबरकर यांच्या हस्ते विजेत्यांना मानाची गदा व उपविजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक पांडुरंग लांजेवार तसेच आयोजक समितीचे सदस्य दिलीप खाडे, फारुख रंगरेज, बाबुलाल पोटदुखे, संतोष जोशी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी पंच म्हणून यवतमाळचे अनिल पांडे यांनी जबाबदारी पार पाडली. वणीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण मैदान दुमदुमून गेले. या यशानंतर लवकरच वणीमध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती दंगल आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा राजू उंबरकर यांनी केली. या स्पर्धेमुळे स्थानिक तरुणांमध्ये कुस्तीबद्दल नव्याने उत्साह निर्माण झाला असून वणीच्या मातीतील परंपरेचा हा पुनर्जन्म सर्वांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.