बहिणीला दिली 1500 रुपये ईदी, नंतर पत्नीशी वाद, आणि बंद खोलीत सापडले 4 मृतदेह

31 Mar 2026 17:51:08
मुजफ्फरनगर,
death-due-to-idi-dispute : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये एका कुटुंबातील चार जणांचे मृतदेह बंद खोलीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 
death-due-to-idi-dispute
 
मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. इरशाद (वय सुमारे ३०-३२), त्याची पत्नी नौरिन आणि त्यांची दोन लहान मुले अशा चौघांचे मृतदेह घरात सापडले. सकाळी घराचे दार उघडत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. दरवाजा तोडून आत पाहिले असता, इरशाद फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर पत्नी आणि दोन्ही मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले होते.
 
प्राथमिक माहितीनुसार, ईदच्या निमित्ताने बहिणीला पैसे दिल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये भांडण सुरू होते. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 
या घटनेनंतर पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मुलांच्या तोंडातून फेस आल्याचे दिसून आले असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
 
पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, नेमके काय घडले याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबातील वाद किती भीषण रूप घेऊ शकतो याची जाणीव पुन्हा एकदा समोर आली आहे.
Powered By Sangraha 9.0