लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय!

31 Mar 2026 16:59:08
मुंबई,
Eknath Shinde's big decision लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर पक्षाने भर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
Maharashtra
 
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह ठाणे मतदारसंघाची जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या सोबत मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनाही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. भिवंडी आणि कल्याण मतदारसंघांसाठी खासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्यांमुळे प्रत्येक मतदारसंघात पक्षाची पकड मजबूत करण्याचा आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क वाढवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत अधिक प्रभावी कामगिरी करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर ही मोठी तयारी मानली जात आहे.
जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेले मतदारसंघ
राज्यातील इतर मतदारसंघांसाठीही विविध नेत्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, नंदुरबारसाठी शिरीष चौधरी, धुळे-दिंडोरीसाठी भाऊसाहेब चौधरी, जळगावसाठी दिलीप लांडे, रावेरसाठी तुकाराम काते, बुलढाण्यासाठी संजय सोनार, अकोल्यासाठी राजन साळवी आणि अमरावतीसाठी किशोर पाटील यांची नियुक्ती झाली आहे. नागपूरसाठी संजय निरुपम, चंद्रपूरसाठी कृपाल तुमाने, गडचिरोली-चिमूरसाठी जगदीश गुप्ता, यवतमाळ-वाशीमसाठी प्रिती बंड आणि हिंगोलीसाठी आनंदराव जाधव यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांसाठी अनुक्रमे दत्ता दळवी, भास्कर आंबेकर, संदिपान भुमरे आणि विलास पारकर यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक, पालघर, रायगड आणि कोकणातील इतर मतदारसंघांसाठीही स्वतंत्र संपर्कप्रमुख नेमण्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, मावळ आणि पुणे मतदारसंघांची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली असून बारामती, शिरूर, सातारा, सांगली, सोलापूर यांसारख्या मतदारसंघांसाठीही स्थानिक नेत्यांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0