गिरड येथील शेतकर्‍याच्या लेकीची दिल्लीत भरारी

31 Mar 2026 18:13:17
समुद्रपूर,
national-leadership-award-honored : तालुक्यातील गिरड येथील एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या माहेश्वरी मंगेश गिरडे हिने जिद्द, चिकाटी, कर्तृत्त्व आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मानाचा ठसा उमटवला आहे. तिची प्रतिष्ठित राष्ट्रीय नेतृत्त्व पुरस्कारासाठी निवड झाली असून, ११ मे रोजी नवी दिल्ली येथे विश्व युवा केंद्र चणकापुरी इथे तिचा गौरव होणार आहे.
 
 
GIRAD
 
 
 
भारत सरकारच्या ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमाला मिनिस्ट्री ऑफ टूरिझ्म आणि हाय कमिशन ऑफ श्रीलंका येथील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. दिल्लीतील प्रतिष्ठित विश्व युवक केंद्रात होणार्‍या प्रोजेट पॉईंटच्या या कार्यक्रमात देश-विदेशातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात देशातील विविध राज्यांमधून निवड झालेले युवा सहभागी होणार असून, दुसर्‍या अंतिम यादीत महाराष्ट्रातून निवड झालेली माहेश्वरी गिरडे ही एकमेव प्रतिनिधी ठरली आहे. तसेच मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अ‍ॅण्ड स्पोर्ट्स, नीती आयोग आदी संस्थांतील मान्यवरांसह अनेक प्रतिष्ठित व्यती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
 
 
माहेश्वरी गिरडे ही आपल्या कुटुंबातील उच्च शिक्षण घेणारी पहिली पिढीतील मुलगी असून, ग्रामीण पृष्ठभूमीतून येत तिने अत्यंत कमी वयात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्य युवक संसदेत मंत्री म्हणून काम करत तिने नेतृत्त्वाची क्षमता सिद्ध केली आहे, तर एक प्रभावी वत्या म्हणून अनेक जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये ती विजेती ठरली आहे. सामाजिक बांधिलकी जपत तिने नेहरू युवा केंद्र संघटन आणि युनिव्हर्सल पीस फेडरेशन यासारख्या संस्थांबरोबर कार्य करत महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि युवक नेतृत्त्वासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. तिच्या कार्याची दखल घेत तिला सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार तसेच महाराष्ट्र रत्न पुरस्कार यासारखे मानाचे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. माहेश्वरीचा हा प्रवास‡शेतकर्‍याच्या घरातून राष्ट्रीय मंचापर्यंत‡अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे.
Powered By Sangraha 9.0