तेहरान
Iran rejects Pakistan's mediation अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थीची तयारी दर्शवली होती. मात्र, इराणने हा प्रस्ताव ठामपणे नाकारला आहे. मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने सोमवारी स्पष्ट केले की, अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा झालेली नाही आणि अशा चर्चेबाबत केलेले दावे चुकीचे आहेत.
दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत फक्त मध्यस्थांच्या माध्यमातून काही संदेश पोहोचवण्यात आले असून, त्यामध्ये अवास्तव आणि जास्त मागण्या मांडण्यात आल्या आहेत. अमेरिकेची भूमिका सातत्याने बदलत असल्याचा आरोप करत, इराणने आपली भूमिका मात्र स्पष्ट आणि ठाम असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, पाकिस्तानने दिलेल्या चर्चेच्या व्यासपीठाबाबतही इराणने स्पष्ट केले की, त्या प्रक्रियेत त्यांनी सहभाग घेतलेला नाही. मात्र, युद्ध थांबवण्यासाठी प्रादेशिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले आहे. त्याचवेळी, या संघर्षाची सुरुवात नेमकी कोणी केली, हेही विसरता कामा नये, असे इराणच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.