इटगाव देशातील पहिली बालस्नेही ग्राम पंचायत!

31 Mar 2026 18:34:42
भंडारा,
child-friendly-gram-panchayat : जिल्हयातील भंडारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या इटगाव पुनर्वसनला ग्राम पंचायतीला सन २०२५ चा राष्ट्रीय स्तराचा ‘बालस्नेही पंचायतीङ्कचा प्रथम पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने ही घोषणा केली असून १ कोटी रुपये ऐवढी पुरस्काराची रक्कम आहे. हा पुरस्कार भंडारा जिल्हयाच्या सन्मानात भर घालणारा आहे.
 

J 
 
भारत सरकार यांच्या वतीने दिला जाणारा ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारङ्क हा देशातील ग्राम पंचायतींसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. हा पुरस्कार वेगवेगळया ९ विषयांच्या आधारे दिला जातो. यातील ‘बालस्नेही पंचायतङ्क या प्रकारात इटगाव पुनर्वसन या ग्राम पंचायतीची प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कारा जिल्हा आणि राज्याचा गौरव वाढविणारा आहे.
 
 
बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात आलेल्या अभिनव व प्रभावी उपक्रमांची दखल घेत या राष्ट्रीय स्तराच्या पुरस्कारासाठी गावाची निवड करण्यात आली आहे. एक कोटी रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. इटगावची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनूसार ६६० असून १६७ कुटूंब आहेत. महिलांची संख्या ३१५ ऐवढी आहे. हा उपक्रम राबविताना आरोग्य, शिक्षण, लसीकरण, पोषण आहार, सुरक्षा आणि पायाभूत सुविधा या विषयांवर विशेष काम करण्यात आले. गावात २०२३-२०२४ मध्ये एकही बालमृत्यू नाही. गावातील बालकांवर वर्षभरात कोणताही गुन्हा दाखल नाही. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे संख्या शुन्य आहे. अशा विविध विषयात चांगली कामगिरी करणारे गाव आज बालस्नेही पुरस्कारासाठी पात्र ठरले आहे. हा पुरस्कार पंचायत राज दिनी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. पुरस्कारामुळे आज एक छोटेशे गाव देशाच्या पातळीवर चर्चेत आले असून जिल्हयाच्या मानात भर पडली आहे.
 
 
गावाप्रतीच्या आस्थेचे फळः चौधरी
 
 
गावा प्रती प्रत्येक गावकèयांच्या मनात असलेली आपुलकी आणि आस्था यातूनच हे शक्य झाले. सगळयांच्या सहकार्याने केलेले प्रयत्न आज राष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरले, अशी प्रतिक्रीया गावच्या सरपंचा कविता चौधरी यांनी दिली.
 
 
सांघिक प्रयत्नाची परिणीती-हुमणे
 
 
गाव मोठे होते, सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून. इटगावने मिळविलेले यश आणि गावात आलेले परिवर्तन हे सांघिक प्रयत्नांची परिणीती आहे. ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, सचिव, अधिकारी, कर्मचारी यांच्या सामुहिक प्रयत्नातून हे यश साकारता आले, अशी प्रतिक्रीया पंचायत समितीचे भंडारा खंड विकास अधिकारी प्रमोद हुमणे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0