अहिंसेचा जयघोष करत यवतमाळात भव्य प्रभात फेरी

31 Mar 2026 20:35:08
यवतमाळ, 
Lord Mahavir Janma Kalyan Festival भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त भारतीय जैन संघटनेच्या वतीने मंगळवार, 31 मार्च रोजी शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. सकाळी 7.30 वाजता बोरास्थान येथून निघालेल्या प्रभातफेरीने संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले.
 
 
jain
 
ही प्रभातफेरी शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत राजेंद्रनगर येथील श्रीमद राजचंद्र ज्ञानमंदिर येथे विसर्जित झाली. अहिंसा परमोधर्म, वंदे वीरम व भगवान महावीर की जय अशा घोषणांनी संपूर्ण यवतमाळ शहर दुमदुमून गेले. यानंतर सकाळी ‘भगवान महावीर मार्ग’ फलकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी जनसेवा समितीचे अध्यक्ष महावीर भन्साली, युवा समितीचे अध्यक्ष श्याम भन्साली, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय जैन, डॉ. रमेश खिवसरा, विजय बुंदेला, उमेश बैद, संदीप कोचर, आदेश लुणावत, दीपक बोरा, प्रशांत दर्डा, पुखराज झांबड, श्रीचंद बोथरासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
Lord Mahavir Janma Kalyan Festival  सकाळी 10 वाजता आराधना भवन येथून भव्य अहिंसा दुचाकी रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या रॅलीला महावीर भन्साली, डॉ. रमेश खिवसरा, गौतम कटारिया व माजी जिल्हाध्यक्ष विजय कोटेचा यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. शहरातील विविध ठिकाणी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच नागरिकांसाठी शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली. दत्त चौक परिसरात विश्व हिंदू परिषदेतर्फे पुष्पवर्षाव करून रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. या रॅलीचा समारोप वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय येथे झाला. यावेळी रुग्णांना फळे व बिस्किटांचे वितरण करण्यात आले. तसेच नंदादीप फाऊंडेशनच्या वतीने बेघर रुग्णांसाठी भोजनदान करण्यात आले. केसरिया भवन येथे महिला मंडळाच्या वतीने गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना जैन समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Powered By Sangraha 9.0