मुंबई,
Maharashtra ranks second in fishing industry भारताच्या नीलक्रांतीत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले मजबूत स्थान सिद्ध केले आहे. मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीत राज्याने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती करत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात सुमारे ३ हजार ६८४ कोटी रुपयांची असलेली निर्यात २०२४-२५ मध्ये थेट दुप्पट होत ७ हजार ३४३ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. केवळ आर्थिक वाढच नव्हे, तर निर्यातीच्या प्रमाणातही वाढ झाली असून राज्यातून दरवर्षी सुमारे २.२७ लाख मेट्रिक टन सागरी उत्पादनांची निर्यात होत आहे. या कामगिरीमुळे महाराष्ट्र देशातील मत्स्य निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे.
कोकणच्या कोळंबीला जागतिक मागणी
कोकण किनारपट्टीवरील मत्स्य व्यवसायाने या यशात मोठा वाटा उचलला आहे. येथील कोळंबी आणि गोठवलेली मासळी परदेशात विशेष पसंतीस उतरली असून, जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. विशेषतः अमेरिका आणि चीनसारख्या देशांमध्ये या उत्पादनांना मोठी मागणी असून, राज्याने स्पर्धात्मक वातावरणातही आपले स्थान भक्कम ठेवले आहे.
जागतिक बाजारपेठेतील किमतींचे चढ-उतार आणि वाढता खर्च यांसारखी आव्हाने असतानाही महाराष्ट्राने गुजरात आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांशी स्पर्धा करत आपली ओळख कायम राखली आहे. भारतीय मत्स्य उत्पादनांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी मिळत आहे. २०२४-२५ मध्ये अमेरिकेला सर्वाधिक म्हणजे २२ हजार ७२३ कोटी रुपयांची निर्यात झाली, तर परिमाणाच्या दृष्टीने चीनने मोठ्या प्रमाणावर आयात केली. याशिवाय युरोपियन देश, दक्षिण-पूर्व आशिया आणि जपानमध्येही भारतीय मासळीची चांगली मागणी दिसून आली आहे. या वाढत्या निर्यातीमुळे भारतीय मत्स्य व्यवसायाला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळत असून, महाराष्ट्र या क्षेत्रात आघाडीचे राज्य म्हणून पुढे येत आहे.