मुंबई
transfers-of-ias-officers : महाराष्ट्रात प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून राज्य सरकारने १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे प्रशासनात नव्या जबाबदाऱ्या आणि नेतृत्वाची पुनर्रचना करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून काहींना नवी जबाबदारी देण्यात आली आहे. या फेरबदलात वरिष्ठ अधिकारी अश्विनी भिडे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच काही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त पदांवरही बदल करण्यात आले आहेत.
यामध्ये रुबल अग्रवाल यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, नयना गुंडे यांना अमरावती विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. श्वेता सिंघल यांची महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे, तर अशोक काकडे यांची महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळात बदली करण्यात आली आहे.
याशिवाय, डॉ. मैनक घोष यांची सांगली जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, प्रियंवदा म्हाड्डळकर यांना धाराशिव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून सातत्याने प्रशासन अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी अशा बदल्या केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. या बदल्यांमुळे राज्यातील विविध विभागांच्या कामकाजात गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.