काँग्रेसचे आरोप निराधार; भाजपचे ठाम प्रत्युत्तर

31 Mar 2026 19:24:53
गडचिरोली, 
ramesh-barsagade : काल, 30 मार्चला काँग्रेस पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर व सरकारवर करण्यात आलेले आरोप निराधार असून केवळ राजकारणातून प्रेरित आहेत, असे स्पष्ट करत आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या आरोपांचे खंडन केले.
 

JLK 
 
 
 
या पत्रकार परिषदेला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, महामंत्री प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, अरुण हरडे, नगरसेविका सीमा कन्नमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
बारसागडे यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी उद्योग आवश्यक असून त्याद्वारे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याचे काम सुरू आहे. मात्र काँग्रेसचे काही नेते या विकास प्रक्रियेला अडथळा आणण्यासाठी चुकीची माहिती पसरवत आहेत.
 
 
एमआयडीसी संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, संबंधित क्षेत्राची निवड ही शासनाच्या धोरणानुसार करण्यात आली असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. प्रशासनाकडून सर्व बाबींची योग्य तपासणी करूनच पुढील प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
 
 
शेतकर्‍यांच्या जमिनींच्या प्रश्‍नावरही बारसागडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. शेतकर्‍यांच्या संमतीशिवाय कोणतीही जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी यांनीदेखील याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
 
 
काँग्रेसवर टीका करताना त्यांनी म्हटले की, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनात श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्यक्षात कोणाचा स्वार्थ गुंतलेला आहे, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे.
 
 
शेवटी, भारतीय जनता पार्टी ही शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे बारसागडे यांनी नमूद केले.
Powered By Sangraha 9.0