दिव्यांग विभागातून तुकाराम मुंढेंची बदली; चर्चांना उधाण

31 Mar 2026 17:05:10
मुंबई,
Replacement of Tukaram Mundhe राज्य प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून दहा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे विविध महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्याने प्रशासनात हालचाल वाढली आहे.या फेरबदलात मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदत कार्य विभागात बदली करण्यात आली आहे.
 

tukaram mundhe 
 
तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेल्या प्रकरणांवर कठोर कारवाई केली होती. अनेक जिल्ह्यांमध्ये शेकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू असतानाच त्यांची बदली झाल्याने याबाबत चर्चा सुरू झाली आहे.इतर बदल्यांमध्ये लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे, तर विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात बदली करण्यात आली आहे. विनिता वैद्य सिंघल यांना मृद व जलसंधारण विभागाची जबाबदारी देण्यात आली असून परिमल सिंह यांची कृषी विभागात सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.
 
 
याशिवाय माणिक गुरसळ यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी, लहू माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, तर प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पृथ्वीराज बी. पी. यांना वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.या व्यापक फेरबदलामुळे राज्यातील प्रशासनिक यंत्रणेची पुनर्रचना करण्यात आली असून आगामी काळात विविध विभागांमध्ये कामकाजाला नवे गतीमान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0