सावली वनपरिक्षेत्रात मोहफुलांसाठी आग लावणे पडले महागात

31 Mar 2026 21:12:41
सावली, 
sawali-forest-area : सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सिरसीमधील कक्ष क्रमांक 1534 (संरक्षित वन) मध्ये मोहफुले वेचण्याच्या निमित्ताने आग लावणार्‍या मौजा लोंढोली येथील वनमाला मोरेश्वर घोंगडे, उमेश नरेंद्र घोंगडे, भूपेंद्र नीलकंठ खोबे या तिघांविरुद्ध वनविभागाने वन गुन्हा दाखल केला.
 
 
j
 
28 मार्च रोजी सिरसीचे वनरक्षक हे आपल्या पीआरटी चमूसह जंगलगस्त करीत असताना वनमाला घोंगडे, उमेश घोंगडे, भूपेंद्र खोबे हे आरोपी जंगलात आग लावून पळून जात असताना वन कर्मचार्‍यांनी रंगेहात पकडले. या तिन्ही आरोपींंविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33 (ड) नुसार 2 वर्षापर्यंत कैद व आगीत सजीव सृष्टीची फार मोठी हानी झाल्यामुळे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9 व 39 अन्वये 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
 
 
या प्रकरणी चंद्रपूरचे विभागीय वनाधिकारी राजन तलमले, सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात व्याहाडचे क्षेत्र सहायक मारुती पुल्लेवाड पुढील तपास करीत आहे. प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सिरसीचे वनरक्षक महादेव मुंडे, गायडोंगरीचे वनरक्षक एकनाथ खुडे, उपरीचे वनरक्षक डांगे, नवेगावच्या वनरक्षक सुषमा मेश्राम तसेच पीआरटी चमू व सिरसीचे बीट मदतनीस यांनी सहकार्य केले.
 
आग लावणार्‍यांची माहिती देणार्‍यास 10 हजारांचे बक्षीस
 
 
आग लावणार्‍यांची नावे सांगितल्यास माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व त्यांना रोख 10 हजार रुपये नगदी स्वरूपात बक्षीस देण्यात येईल. वनाचे महत्त्व लक्षात घेऊन शेतावरील पाळे-धुरे जाळताना मोहाचे झाडाखाली जाळताना जंगलाला आग लागणार नाही, याची दक्षता घेऊन नागरिकांनी पर्यावरण संवर्धनास सहकार्य करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0