मोठी बातमी...नालंदा शीतला मंदिरात चेंगराचेंगरी, ८ ठार

31 Mar 2026 11:36:43
नालंदा,
Stampede at Nalanda Sheetla Temple बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील शीतला मंदिराच्या जत्रेत मंगळवारी भीषण दुर्घटना घडली. बिहार शरीफमधील माघरा परिसरात आयोजित या धार्मिक कार्यक्रमादरम्यान अचानक चेंगराचेंगरी होऊन आठ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक भाविक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना त्वरित बिहार शरीफ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
Stampede at Nalanda Sheetla Temple
 
 
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. सकाळपासूनच मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होती. याच दरम्यान अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. स्थानिकांच्या मते, सुरुवातीला पुरेशा प्रमाणात व्यवस्था आणि नियंत्रण नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. अनेक भाविक दर्शनासाठी घाई करत असल्याने गर्दीत ढकलाढकली वाढली आणि त्यातूनच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, या घटनेनंतर मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जत्रा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. योगायोगाने त्याच दिवशी द्रौपदी मुर्मू या नालंदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून राजगीर येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0