राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अनिता साटोणे यांना द्वितीय पुरस्कार

31 Mar 2026 19:19:09
वर्धा, 
state-level-innovation-competition : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२५-२६ घेण्यात आली होती. या स्पर्धेत स्थानिक बजाज विज्ञान महाविद्यालयातील पर्यावरण व रसायनशास्त्र शिक्षिका अनिता साटोणे यांनी सादर केलेल्या ‘निसर्गाचा ध्यास, तंत्रज्ञानाचा श्वास -सांगड निसर्गाची व तंत्रज्ञानाची’ या नवोपक्रमाला माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. यानिमित्त त्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
 
 
JKL
 
 
 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि नायरा एनर्जी लिमिटेडच्या संयुत वतीने आयोजित या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे होते. यावेळी निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. उर्मिला हाडेकर, डॉ. मडावी, विस्तार अधिकारी राजेंद्र म्हस्के तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 
अनिता साटोणे यांच्या उपक्रमांमध्ये वर्षभर पर्यावरणाशी संबंधित विविध दिवसांचे औचित्य साधत व शासनाच्या विविध अभियानांशी संलग्न राहून विद्यार्थ्यांकडून कृतीशील व अनुभवाधारित शिक्षण राबविण्यात आले. वृक्षलागवड, औषधी वनस्पतींचा अभ्यास, मायक्रोग्रीन प्रकल्प, पाणी गुणवत्ता विश्लेषण, जैवविविधता व ऊर्जा ऑडिट, कचरा व्यवस्थापन, तसेच यूआर कोड आधारित डिजिटल इको गार्डन, पर्यावरण जनजागृतीसाठी वेबसाईट निर्मिती, एयूआय विश्लेषण व इको-टेक मॉडेल्स तयार करणे अशा विविध उपक्रमांचा प्रभावी समावेश करण्यात आला.
 
 
या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल सखोल जागरूकता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती, सर्जनशीलता व तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याची क्षमता विकसित झाली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून शिकत समस्या ओळखणे, उपाय शोधणे, नवकल्पना साकार करणे तसेच समूहात प्रभावीपणे कार्य करणे यासारखी जीवनावश्यक कौशल्ये आत्मसात केली. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होत असून त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडून येत आहे. तसेच विविध पर्यावरण दिनांचे औचित्य साधून पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, स्वच्छता मोहीम व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.
 
 
अनिता साटोणे यांनी या यशाचे श्रेय बजाज विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. टेकाडे, उपप्राचार्य एस. ई. नाखले, तसेच सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याला दिले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे
Powered By Sangraha 9.0