वर्धा,
tribute-to-datta-meghe : अग्निहोत्री महाविद्यालयातील शिवशंकर सभागृहात स्व. दत्ता मेघे यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री होते. व्यासपीठावर श्रीराम मंदिरचे उपाध्यक्ष संजीव लाभे, डॉ. बिरबल जैन, श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष अरुण काशिकर, कमल कुलधरिया आदी उपस्थित होते.

यावेळी पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री म्हणाले की, दत्ताजी मेघे हे नाव घेतलं की मनात प्रथम येतं ते म्हणजे खरी मैत्रीची जीवंत प्रतिमा. त्यांचं खुलं हृदय आणि उदार मन प्रत्येकाला आपलसं वाटत होतं. जीवनाच्या कोणत्याही वळणावर ते सोबत उभे राहायचे. दुःखात आधार द्यायचे, आनंदात सहभागी व्हायचे आणि नेहमीच सकारात्मक ऊर्जा वाटायचे. त्यांची मैत्री ही फत शब्दांपुरती मर्यादित नाही, तर प्रत्यक्ष कृतींमध्ये दिसायची. अशी खरी मित्रता आजच्या धावपळीच्या जगात दुर्मीळ आहे. दत्ताजींच्या संगतीमुळे जीवन अधिक सोपं आणि आनंदमय वाटायचं. त्यांचं हे खुलं मन, समाजकार्य, शिक्षण आणि सामाजिक विकासातही दिसायचं. ते केवळ मित्र नव्हे, तर प्रेरणास्थान होते, असेही पं. अग्निहोत्री म्हणाले.
विद्यापीठातील त्यांचे कार्य, सामाजिक चळवळी आणि ग्रामीण विकासासाठी केलेले योगदान हे त्यांच्या सच्च्या मित्रत्त्वाचे प्रत्यक्ष उदाहरण होते. महाराष्ट्राच्या भूमीवर, विशेषतः विदर्भात त्यांनी हजारो मित्र तयार केले, ज्यांचे जीवन त्यांच्या प्रेरणेने उजळले. दत्ताजींच्या जाण्याने एक युग संपले. तुमच्या खुल्या हृदयाची आठवण आम्हाला नेहमी प्रेरित करेल. आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही, अशी शोकसंवेदना यावेळी त्यांनी व्यत केली. यावेळी संजीव लाभे, डॉ. अशोक जैन, संदीप चिचाटे यांनी श्रीद्धांजली अर्पण केली.
संचालन प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोठारे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. निरजसिंह यादव, डॉ. लगजानन जंगमवार, डॉ. प्रसाद जुमळे, डॉ. रितेश सुळे, डॉ. दिनेश वंजारी, प्रा. धनंजय सिंगणजुडे, प्रा. संगीता कोठारे, प्रा. निळकंठ ढोबाळे, अमोल तळवेकर, पत्रकार अनूप भार्गव, अभिजीत रघुवंशी, गणेश काळे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.