मुंबई,
Aditya Thackeray says no decision राज्यसभेच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले असताना महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून घडामोडींना वेग आला आहे. आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव पुढे येत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र या संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्यातील सहा जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक होणार असून त्यापैकी पाच जागा महायुतीच्या खात्यात जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. उर्वरित एक जागा महाविकास आघाडीला मिळणार असल्याने त्या एका जागेसाठी आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमावरून भूमिका मांडत राज्यसभेच्या जागेबाबत अजून निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. सर्व नेते एकत्र बसून लवकरच याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेसाठी शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा, अशी विनंती या भेटीत करण्यात आल्याचे सांगितले जाते. काही वृत्तांमध्ये पवार यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले गेले होते; मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याचे स्पष्ट केले.
या जागेबाबत शिवसेनेतील एका गटाकडून ती जागा आपल्या पक्षालाच मिळावी, असा आग्रह धरला जात असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, काँग्रेसकडून वेगळी मांडणी पुढे आल्याचेही बोलले जाते. त्यामुळे आघाडीतील समन्वय आणि अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्रित चर्चा करून उमेदवारीचा निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.