महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एनडीएचे उमेदवार जाहीर, यादीत कोणाचे नाव पहा

04 Mar 2026 12:14:40
मुंबई, 
candidates-for-rajya-sabha-from-maharashtra भारतीय जनता पार्टीने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, तसेच पक्षाच्या अंतर्गत समीकरणांनाही स्पष्टता आली आहे. भाजपने केंद्रीय मंत्री रामदास आठावले, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह माया चिंतामण इवनाटे आणि रामराव वडकुते यांची नावे जाहीर केली आहेत.
 
candidates-for-rajya-sabha-from-maharashtra
 
या यादीतील सर्वात महत्त्वाचे नाव विनोद तावडे आहे. महाराष्ट्रातील राजकारणात काही काळ बाजूला राहिलेले तावडे यांनी केंद्रीय संघटनेत सरचिटणीस म्हणून आपली क्षमता सिद्ध केली आहे. आता त्यांना राज्यसभेत निवडून देऊन पक्षाने दिल्लीतील प्रभाव वाढवण्याचे संकेत दिले आहेत. मराठा समुदायातील ताकद आणि संघटनात्मक बळ या दोन्ही दृष्टिकोनातून तावडे यांचे तिकीट महत्त्वाचे मानले जाते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठावले यांना पुन्हा उमेदवारी देणे म्हणजे भाजपाने मित्रपक्षांना महत्वाचा संदेश दिला आहे. दलित राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे आठावले हे एनडीएचे दीर्घकाळचे व निष्ठावंत सहकारी आहेत. त्यांच्या पुन्हा उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत दलित मत मिळवण्याचा धोरणात्मक फायदा मिळेल.
 
भाजपाने माया चिंतामण इवनाटे आणि रामराव वडकुते यांची निवड करून आदिवासी आणि ओबीसी समुदायातील आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. इवनाटे यांचे नाव आदिवासी समुदायामध्ये पक्षाचे स्थान मजबूत करण्यासाठी समोर आले, तर वडकुते यांची निवड ओबीसी समाजात भाजपाची पकड वाढवेल. या उमेदवारांच्या निवडीमुळे महाविकास आघाडीच्या गणितांवर परिणाम होणार आहे. संख्यात्मक ताकदीच्या आधारे चारही भाजप उमेदवारांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. आता सर्वांचे लक्ष विरोधी पक्ष किती उमेदवार उभे करणार आणि निवडणूक बिनविरोध होईल की मतदानाची आवश्यकता पडेल, यावर लागले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0