देश-विदेशातून होळीनिमित्त भाविकांची ब्रजमध्ये गर्दी!

04 Mar 2026 10:01:15
मथुरा,
Crowd of devotees in Braj रंगपंचमीच्या उत्साहात न्हाऊन निघालेल्या उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील ब्रज प्रदेशात यंदा विक्रमी गर्दी होत आहे. राधा-कृष्णांच्या दैवी प्रेमाशी जोडल्या गेलेल्या अनोख्या होळी उत्सवासाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रज मंडळात मथुरा, वृंदावन तसेच परिसरातील तीर्थक्षेत्रांमध्ये आतापर्यंत ४४ लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे. देशाच्या विविध भागांबरोबरच परदेशातूनही मोठ्या संख्येने भक्त येथे दाखल होत आहेत.
 
 
 

devotees in Braj 
अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) सुरेश चंद्र रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रजमधील विविध पारंपरिक होळी कार्यक्रमांमध्ये लाखोंची उपस्थिती नोंदवली गेली आहे. बरसाना येथील लाडलीजींचे विशेष दर्शन, चैत्र महिन्यातील बलदेव आणि जब गावातील हुरंगा, तसेच मुखराय येथे सादर होणारे चारकुला नृत्य यांसारख्या कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही प्रमुख दिवसांमध्ये पाच ते सहा लाख भाविकांची उपस्थिती राहू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. होळीच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांनी कडक नजर ठेवली आहे. गोवर्धन आणि मगोरा पोलिस ठाणे हद्दीत महिलांवर जबरदस्तीने गुलाल फेकणे आणि शांतता भंग करण्याच्या आरोपांवरून २४ हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गोवर्धन परिसरात १७ आणि मगोरा भागात नऊ जणांवर कारवाई करून त्यांना कारागृहात पाठवण्यात आले असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत होळीचा उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी प्रशासन सज्ज असून संपूर्ण ब्रज प्रदेशात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0