बालाघाटच्या अट्टल चोरांना गोंदिया पोलिसांचा दणका

04 Mar 2026 17:15:27
गोंदिया,
gondia police घर बंद असल्याची संधी साधत रामनगर हद्दीत घरफोडी करणार्‍या बालाघाटच्या दोन अट्टल चोरांच्या गोंदिया पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. राहुल पालेवार (२४) व शोएब खान (२५) दोघेही राहणार बालाघाट (म.प्र.) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही चोरट्यांची नावे आहे.
 

गोंदिया पोलीस  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ जानेवारी २०२६ रोजी शिवाजी सुदाम राठोड (रा. गोकुलनगर, कुडवा) यांनी रामनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीनुसार ते २९ जानेवारी रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ८८ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडे देण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि हालचालींवर बारीक नजर ठेवत पोलिसांनी संशयाची सुई थेट मध्यप्रदेशातील बालाघाटकडे वळवली. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार राहुल पालेवार व शोएब खान या दोघांनी संगनमताने घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. २४ फेब्रुवारी रोजी पोलिस पथकाने बालाघाट येथे धडक देत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या आरोपींनी सखोल चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे कंगन, टोपली वेल, बाली, लगड, लॉकेट तसेच रोख रक्कम असा एकूण ९.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, चोरीस गेलेल्या रकमेपेक्षा अधिक किंमतीचा दागिन्यांचा साठा आरोपींकडून हाती लागल्याने त्यांच्या इतर गुन्ह्यांतील सहभागाबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून पुढील तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.gondia police ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे व उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या सहकार्याने संयुक्त पथकाने ही कारवाई यशस्वी केली
Powered By Sangraha 9.0