सेलू,
holi-without-colors-surgaon : आदर्श गाव म्हणून नावलौकिक कमावलेल्या सुरगावात २८ वर्षांपासून चालत आलेल्या आदर्श परंपरेनुसार यंदाही रंगाविना धुलीवंदन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. सप्त खंजिरी वादक प्रवीण देशमुख यांच्या पुढाकारातून आणि अभिनव धुळवंड व संत विचार ज्ञानयज्ञ यांच्या संकल्पनेतून सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. उत्सवाची सुरुवात रविवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली होती.
तीन दिवस चाललेल्या या उत्सवात सोमवारी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम पार पडले. मंगळवारी सकाळी ८ वाजता ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान मार्गदर्शन, धुलीवंदन संदेश आणि गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. गावातील सर्व वयोगटातील नागरिक लहान मुले, तरुण-तरुणी तसेच वयोवृद्ध महिला-पुरुष या उत्सवात उत्साहाने सहभागी झाले. यावेळी सुरेश मांडले, दादा हांडे वागदरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संत विचार प्रवचन, ज्ञानयज्ञ, कार्यकर्ता सत्कार, दानवाटप आणि भजन संमेलन यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दुपारी गावकर्यांचे स्नेहभोजन झाले.
या सोहळ्याला भाऊसाहेब थुटे, मोहन गुजर, मोहन अग्रवाल, तहसीलदार डॉ. शकुंतला पराजे, मुरलीधर बेलखोडे, अनिल नरेड्डी, शंकर मोहोळ, सुनील बुरांडे, भास्कर वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजता सप्त खंजिरी वादक प्रवीण देशमुख यांच्या कलात्मक सादरीकरणाने या रंगाविना धुलीवंदन सोहळ्याची सांगता झाली.