अमेरिकेतील स्पर्धेत इराण खेळणार का? अनिश्चिततेचे सावट

04 Mar 2026 10:05:40
 तेहरान,
Iran will not play in the US tournament आखात परिसरात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद येत्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेवर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणिमेक्सिको या तीन देशांत संयुक्तरित्या होणार असून एकूण १०४ सामने खेळवले जाणार आहेत. मात्र या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला इराणचा सहभाग आता अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. इराणचे साखळी फेरीतील तीन सामने अमेरिकेत नियोजित असून त्यापैकी दोन सामने कॅलिफोर्निया राज्यातील इंगलवूड येथे आणि दोन सामने सिएटल येथे होणार होते. परंतु सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणकडून स्पर्धेत भाग घेण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
Iran will not play
 
इराण फुटबॉल महासंघाचे वरिष्ठ अधिकारी मेहदी ताज यांनी स्पष्ट केले की, आमच्याविरुद्ध इतका मोठा संघर्ष छेडला गेला असताना आणि सर्वोच्च नेत्यांसह अनेकांचा बळी गेला असताना आम्ही विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होऊ, असे वाटत नाही. मेहदी ताज हे आशियाई फुटबॉल महासंघाचेही अध्यक्ष आहेत.आशिया खंडातील बलाढ संघ म्हणून इराणची ओळख आहे. गेल्या आठपैकी सहा विश्वकरंडक स्पर्धांसाठी त्यांनी पात्रता मिळवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रमवारीत २११ संघांपैकी इराणचा संघ विसाव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी वॉशिंग्टन येथे झालेल्या सोडत कार्यक्रमात इराणला अग्रक्रम देण्यात आला होता. त्या वेळी अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल ट्रम्प यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला; मात्र इराणच्या काही अधिकाऱ्यांना प्रवेश परवाना नाकारण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. सोडतीनुसार इराणला बाद फेरी गाठण्याची चांगली संधी मिळाल्याचे मानले जात होते.
 
 
दरम्यान, इराण स्वतःहून माघार घेणार की अमेरिका सरकार त्यांच्या संघाला प्रवेश नाकारेल, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस मथायस ग्राफस्ट्रॉम यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्याचे सांगितले, मात्र कोणतेही ठोस भाष्य टाळले. इराणने स्पर्धेतून माघार घेतल्यास त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. स्पर्धा सुरू होण्याच्या तीस दिवसांपूर्वी माघार घेतल्यास मोठ्या रकमेचा दंड आकारला जाऊ शकतो, तर शेवटच्या क्षणी सहभाग नाकारल्यास दंडाची रक्कम दुप्पट होऊ शकते. इतकेच नव्हे तर पुढील २०३० मधील विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतूनही इराणला वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जागतिक फुटबॉलमधील या महत्त्वाच्या स्पर्धेवर युद्धाच्या सावटाचे गडद ढग दाटले आहेत.
Powered By Sangraha 9.0