लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ले तीव्र; चार ठार

04 Mar 2026 09:12:14
बेरूत,
Israeli attacks intensify in Lebanon लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला असून ताज्या इस्रायली हल्ल्यांत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच चिघळली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इस्रायल संयुक्त लष्करी कारवाईनंतर इराणमध्ये सत्तांतराच्या शक्यतेवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, इराणी राजवटीतील एखाद्या व्यक्तीने सत्ता हाती घेणे हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र, इराणच्या शेवटच्या शाहचा मुलगा रेझा पहलवी यांना सत्ता देण्याच्या कल्पनेला त्यांच्या प्रशासनाचा पाठिंबा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्हाला सर्वोत्तम वाटणारे लोक आता मेले आहेत. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे पुन्हा पूर्वीच्या शहासारखीच वाईट सत्ता येणे. आम्हाला तसे होऊ द्यायचे नाही,” असे ट्रम्प यांनी नमूद केले.
 
 

Israeli attacks intensify in Lebanon 
इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनीयांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्याची चर्चा आहे. इराणच्या तज्ञांच्या सभेने त्यांना उत्तराधिकारी म्हणून निवडल्याचे सांगितले जात आहे. याचदरम्यान इस्रायलने इराणवरील हल्ले तीव्र केले आहेत. तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले असून आकाशात लढाऊ विमाने फिरताना दिसली. इस्रायली सैन्याने तेहरान आणि इस्फहान येथील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र उत्पादन व साठवण केंद्रांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. इराणी सरकारी टीव्हीच्या माहितीनुसार, तेहरानमधील एका प्रसारण केंद्रावर दोन स्फोट झाले, मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 
 
तसेच, उपग्रह प्रतिमांमध्ये नतान्झ अणुसुविधेचे मोठे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. एक दिवस आधीच्या प्रतिमांच्या तुलनेत अनेक इमारतींचे नुकसान स्पष्ट दिसते. प्लांट परिसरातील कर्मचारी राहत असलेल्या इमारतींनाही फटका बसल्याचे वृत्त आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली असून पुढील घडामोडींवर जगाचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0