मुंबई,
Mercury in Vidarbha nears 40 degrees मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पिवळा इशारा जारी केला आहे. ४ आणि ५ मार्चदरम्यान या भागात तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात उष्णता व दमटपणा दोन्ही वाढले असून दुपारच्या वेळी उकाडा अधिक जाणवत आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तीव्र राहू शकतो. मध्य भारतासह महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत उष्णतेच्या लाटा येण्याचीही चिन्हे आहेत.

मार्च महिन्यातच तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील ४८ तास मुंबई आणि आसपासच्या भागासाठी महत्त्वाचे मानले जात असून मुंबईत कमाल तापमान सुमारे ३६ अंश तर किमान तापमान २२ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्रातील अधिकारी सुष्मा नायर यांनी सांगितले की, मार्चपासूनच उष्णतेची तीव्रता वाढू लागेल आणि एप्रिल-मे महिन्यांत उकाडा शिगेला पोहोचेल. यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच राज्यात उन्हाची चाहूल लागली होती. मागील आठवड्यात विदर्भातील काही भागांत पावसाची नोंद झाली असली तरी त्यानंतर पुन्हा तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ३८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत २९ ते ३३ अंशांदरम्यान तापमान राहण्याची शक्यता असून आकाश ढगाळ राहू शकते. पुण्यात सुमारे २६ अंश तापमानासह स्वच्छ आकाश, नागपूरमध्ये सुमारे २७ अंशांसह धुरकट वातावरण, सोलापुरात ३१ अंश आणि नाशिकमध्ये २४ अंश तापमानाची नोंद आहे.
कोकण किनारपट्टीवर मध्यम ते उष्ण स्वरूपाचे तापमान राहण्याची शक्यता असताना मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. विदर्भातील काही जिल्ह्यांत तापमान ४० अंशांच्या दिशेने जात असल्याने तेथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही हवामान अभ्यासकांनी पुढील काही महिन्यांत ‘एल निनो’ स्थिती निर्माण होऊ शकते, अशीही शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने नागरिकांना दिला आहे.