तभा वृत्तसेवा
मुंबई,
Vijay Wadettiwar, नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे 1 मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात 19 कामगारांचा मृत्यू झाल्याच्या पृष्ठभूमीवर, काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत या घटनेवर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे मान्य करत येत्या शुक्रवारच्या आत लक्षवेधीच्या माध्यमातून सविस्तर चर्चा घडवून आणण्याचे निर्देश दिले.
विधानसभाध्यक्षांनी सर्व स्थगन प्रस्तावाच्या सुचना दालनात फेटाळल्या मात्र, वडेट्टीवार यांनी दिलेली स्थगनची सूचना ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने त्यांना तो सादर करण्याची परवानगी दिली. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार गंभीर जखमी आहेत. या प्रकरणात 11 आरोपींना अटक करण्यात आली असून कंपनीचा मालक आलोक चौधरी अद्याप फरार आहे.गेल्या दीड वर्षांत नागपूर परिसरातील स्फोटक कारखान्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांचा उल्लेख करत 43 कामगारांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. केवळ 300 रुपयांच्या मजुरीसाठी जीव धोक्यात घालणाèया कामगारांच्या सुरक्षिततेबाबत सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. वारंवार ‘सेफ्टी ऑडिट’ची मागणी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटनेचे (पेसो) कार्यालय, कारखाना निरीक्षक आणि कामगार खात्याच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मृतांच्या कुटुंबीयांना केवळ Vijay Wadettiwar आर्थिक मदत जाहीर करून चालणार नाही, तर दोषींवर कठोर कारवाई आणि कारखान्यांमध्ये कडक सुरक्षा मानके लागू करणे आवश्यक असल्याची भूमिका विरोधकांनी मांडली. याची दखल विधानसभाध्यक्षांनी घेत याविषयावर बोलण्याची सत्ताधारी पक्षांचीदेखील माझ्याकडे मागणी असल्यानं, सर्वांनाच संधी मिळावी यासाठी शुक्रवारच्या आत लक्षवेधी सूचनेच्यामाध्यमातून सविस्तर चर्चा घडवून आणू, असे सभागृहात सांगितले.