तभा वृत्तसेवा
राळेगाव,
ralegao holi होळीची धुळवड म्हटलं की विविध रंग, छटा आणि असंख्य रंगाची उधळण अशीच कल्पना आपल्या डोळ्यांसमोर येते. परंतु यवतमाळ जिल्हा मारेगाव तालुक्यातील बोरी गदाजी एक असे गाव आहे, ज्या ठिकाणी रंगांऐवजी एकमेकांवर दगडांची उधळण केल्या जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा आजतागायत चालू आहे.
बोरी गदाजी हे गाव रक्तरंजित होळीकरिता दरवर्षी चर्चेत असते. गदाजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या या गावामध्ये मागील कित्येक वर्षांपासून ही परंपरा अविरत चालू आहे. होळीच्या दिवशी या गावी तूफान दगडफेक होते. ही दगडफेक आकसापोटी किंवा भांडणातून नव्हे तर परंपरेचा एक भाग म्हणून केली जाते.
दरवर्षी फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळीच्या दिवशी या गावी गदाजी महाराज यांची भव्य यात्रा भरते. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक येतात. या दिवशी गावातील नागरिक एकमेकांवर, तूफान दगडफेक करतात. ही दगडफेक श्रद्धेचा भाग म्हणून पाळला जाते. विशेष असे की, एकमेकांचे रक्त निघेपर्यंत ही दगडफेक सुरूच असते. या दगडफेकीत सहभागींना ‘होळकर’ म्हणतात.
परंपरेचे कारण
अनेक वर्षांपूर्वी या गावी गदाजी महाराजांचे वास्तव्य होते. एके दिवशी गदाजी महाराज घोड्यावर बसून गावात आले. त्यांना पाहायला ग्रामस्थ आणि लहान मुलांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे संतापलेल्या महाराजांनी दगड फेकून मारले. त्यातील एक दगड लहान मुलाला लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावकरी खवळले आणि त्यांनी गदाजी महाराजांना बांधून ठेवले.
तेव्हा महाराजांनी सांगितले की, या मृत मुलाला होळीचे भस्म लावा तो जिवंत होईल, आणि झालेही तसेच. या घटनेच्या प्रभावाने पुढे दरवर्षी त्या ठिकाणी होळीच्या दिवशी दगडफेक करून रक्तरंजित होळी सुरू झाली. ती परंपरा अनेक वर्षांपासून आजही तशीच सुरू आहे.
...अन् काढली जाते जिवंत प्रेतयात्रा
बोरी गदाजी येथे गावाजवळून वाहणाऱ्या नदीकाठावर महाराजांचे मंदिर आहे. धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी गावकरी कबड्डी हा परंपरागत खेळ खेळतात. या खेळात शेवटी बाद होणाऱ्या व्यक्तीची गावकरी मिळून प्रतीकात्मक शवयात्रा काढतात. गावकरी याला ‘मढं’ असे संबोधतात. हे मढं संपूर्ण गावात बँडच्या तालावर यात्रा काढून फिरवले जाते. त्यानंतर संस्था प्रांगणात जाऊन आंघोळ व पूजाविधी आटोपतात. त्यानंतर गोटमारीला सुरुवात होते.
कशी होते गोटमार ?
बोरी गदाजी यात्रेत दोन गट दोन्ही बाजूंनी तूफान गोटमार करतात. एक गट उंच मचाणावरून खालच्या लोकांवर तर जमिनीवरचा दुसरा गट मचाणावर गोटमार करतो. बँडच्या तालावर ही गोटमार सुरू असते. ही गोटमार तोपर्यंत सुरू असते जोपर्यंत तिथे उपस्थित भाविक रक्तबंबाळ होत नाहीत, तोपर्यंत हे सत्र सुरूच असते. प्रशासकीय पातळीवरून ही परंपरा बंद करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. परंतु गावकèयांचा या परंपरेवरचा विश्वास मात्र कायम आहे.
महाराजांचा दगड..!
शेवटीशेवटी जखमी होणाऱ्याला महाराजांचा दगड लागला असे मानण्यत येते.ralegao holi या वर्षी गोटमार खेळत असताना बोरी गदाजी येथील होळकर प्रवीण गजानन शेंबडे (वय 25 वर्षे) याला सकाळी 11.45 वाजता महाराजांचा दगड लागला. या जखमी ‘होळकरा’ला मंदिरात नेऊन त्याच्या संपूर्ण शरीरावर विभूती लावण्यात आली. यावेळी आमदार संजय देरकर यांनी प्रवीणचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
------