कारंजा तालुक्यात ३० गावात संभाव्य पाणीटंचाईच्या झळा

04 Mar 2026 17:51:45
कारंजा लाड, 
water shortage वाढती उष्णतेची तीव्रता आणि भूजलपातळीत होत असलेली घट लक्षात घेऊन कारंजा तालुका प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार केला आहे. १ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीत हा आराखडा टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून, ३० गावांचा त्यात समावेश आहे.
 
 
पाणी टंचाई
 
 
तहसील प्रशासनाने स्थानिक पाणीस्रोतांची सद्यस्थिती, विहिरी-बोअरवेल्सची क्षमता, नळयोजना आणि मागील वर्षांचा अनुभव यांचा आढावा घेऊन ही पूर्वतयारी केली आहे. उन्हाळ्याच्या काळात पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा, दुर्गम भागात बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा, विहिरींची दुरुस्ती व खोलकरण, विहिरींमधील गाळ काढणे, बंद पडलेल्या बोअरवेल्सची दुरुस्ती आणि आवश्यक ठिकाणी नवीन बोअरवेल खोदकाम, नळयोजनांची तांत्रिक दुरुस्ती व गळती नियंत्रण अशा उपाययोजनांमुळे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या आराखड्याचा पंचायत समिती स्तरावर सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, आवश्यक मंजुरीनंतर संबंधित विभागांना तत्काळ सूचना दिल्या जाणार आहेत. जलसंपदा, ग्रामीण पाणीपुरवठा आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय साधून कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.water shortage उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वेळेआधी आखलेला हा कृती आराखडा प्रभावीपणे राबविला गेला, तर संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.
या गावांचा समावेश
संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या गेलेल्या ३० गावांमध्ये कारंजा तालुयातील शिंगणापूर, गणेशपूर, कामरगाव, तांदळी, टाकळी खुर्द, वापटी, शेलुवाडा-भुलोडा, किसाननगर, दादगाव-नारेगाव, मसला-महागाव, जांब, नागलवाडी, शेमलाई, वढवी, दुधोरा, पसरणी, जानोरी, कुपटी, धोत्रा देशमुख, धोत्रा जहागीर, डोंगरगाव-धामणी, बेंबळा, कोळी, लोणी, अरब-बेलखेड, पिंप्री, मोखड या गावांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0