नवी दिल्ली,
spicejets-8-special-flights-from-uae आखाती देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे स्वदेशी परत आणण्यासाठी स्पाइसजेट या खाजगी विमान कंपनीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. चार मार्च रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील फुजैराह येथून भारतासाठी आठ विशेष उड्डाणे सोडण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे पश्चिम आशियातील अनेक भागांतील हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आले असून त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर झाला आहे.

फुजैराहहून दिल्ली, मुंबई आणि कोची या शहरांकडे ही विशेष उड्डाणे धाव घेणार आहेत. याआधी तीन मार्च रोजीही चार विशेष उड्डाणांद्वारे प्रवाशांना परत आणण्यात आले होते. चार मार्चपासून फुजैराह-दिल्ली आणि फुजैराह-मुंबई ही नियोजित सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. spicejets-8-special-flights-from-uae दरम्यान, कुवेतमध्ये सुमारे तीनशे भारतीय नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्वजण सध्या क्राउन प्लाझा कुवेत येथे वास्तव्यास असून तेथील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अडकलेल्या नागरिकांपैकी कल्पेश संजय राठी यांनी हॉटेल प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली आहे. कुवेत सरकारकडूनही ठोस हमी मिळालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
या अडकलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. रोजगार किंवा इतर कारणांसाठी ते कुवेतमध्ये गेले होते. परिस्थिती गंभीर होत असल्याने या सर्वांनी भारत सरकार तसेच कुवेतमधील भारतीय दूतावासाने तातडीने हस्तक्षेप करून सुरक्षित परतीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.