वाघांचा भ्रमणमार्ग मोकळा करा

04 Mar 2026 18:46:02
चंद्रपूर,
Bandu Dhotre ताडोबा ‘लॅण्डस्केप’च्या सभोवतालचे वाघ आणि अन्य वन्यप्राण्याच्या भ्रमणमार्गातून जाणार्‍या राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वन्यजीव उपशमन योजना राबवा. प्रस्तावित ‘ओव्हरपास’ बांधकामास मंजुरी द्या, लोहारडोंगरी खाण रद्द अशा 16 प्रलंबित मागण्यांसाठी गुरूवार, 5 मार्च 2026 पासून इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे अन्नत्याग सत्याग्रह करणार आहेत.
 

Tadoba wildlife corridor, Bandu Dhotre hunger strike, 
या बेमुदत उपोषण आंदोलनासाठी जिल्हा व वन प्रशासनाने जागाच दिली नसून, त्यांची परवानगी मिळाली नाही, तरी मी इको-प्रो संस्थेच्या कार्यालयात उपोषण करेन, असे ठाम मत धोतरे यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले. केवळ लोहारडोंगरी खाण रद्द व्हावी एवढीच मागणी नसून, जवळपास सोळा अत्यंत महत्त्वाच्या मागणी वर्षोन्वर्ष प्रलंबित आहेत. त्या जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत मी उपोषण कायम ठेवणार, असेही धोतरे यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण प्रेमी सुरेश चोपणे, योगेश दुधपचारे, किशोर जामदार आदी यावेळी उपस्थित होते.
सोळा मागण्यांमध्ये, चंद्रपूर-मूल मार्गावरील प्रस्तावित ‘ओव्हरपास’ला निधी द्यावा, बामणी आष्टी व इतर मार्गावरील ‘अंडरपास’चे बांधकामास मंजुरी प्रदान द्यावी, ‘लोहारडोंगरी’ लोह खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी रद्द करणे, तसेच व्याघ्र अधिवासातील ‘लोहारडोंगरी’ लोह खाण ब्लॉक नेहमीसाठी रद करणे. चंद्रपूर जिल्हयातील वाघ-मानव संघर्षावर प्रभावी उपाययोजना करण्याकरिता राज्य सराकरव्दारा गठित 11 सदस्यीय तांत्रिक समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, कन्हाळगाव व घोडाझरी ही दोन्ही अभयारण्य वन्यजीव विभागाने ताब्यात घेऊन कर्मचारी-अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, ‘बिबट समस्यामुक्त ग्राम योजनेला मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा, चंद्रपूर जिल्हा ‘व्याघ्र जिल्हा’ घोषित करावा, ताडोबासह कन्हाळगाव व घोडाझरी अभयारण्याच्या पर्यटनातून मिळणार्‍या लाभात स्थानिक गावांना 50 टक्के प्रत्यक्ष लाभ मिळण्यास योजना राबवावे, या अभयारण्यालगत ‘कम्युनीटी रिसोर्ट, जिप्सी व होमस्टे’ चालवावे व मिळणार्‍या आर्थिक लाभातून गावविकास करावा, वाढता वाघ-मानव संघर्ष, ‘कॅरींग कॅपेसिटी’ या बाबीचा सर्वांगीण अभ्यास करावा, तसेच वनविभागाच्या अंतर्गत वनव्याप्त गावात ‘पोलिस पाटील’च्या धर्तीवर ‘वनपाटील’ नियुक्त करावे आदींचा समावेश आहे.
 
 
वन विभागाचे दुर्लक्ष
 
 
यांसदर्भात एक महिनापूर्वीच वनमंत्री, प्रथान सचिव, वने तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना निवेदन पाठविण्यात आले होते. सत्याग्रहाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, अन्नत्याग सत्त्याग्रहाच्या मागण्यासंदर्भात अद्याप कुठलीच कार्यवाही न झाल्याने हे उपोषण गुरूवारपासून सुरू करतो आहे. वनविभाग मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप धोतरे यांनी लावला.
पाच वर्षात 200 ग्रामस्थांचा मृत्यू
वाघ-मानव संघर्ष वाढला असून, मागील पाच वर्षात 200 ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ, हा संघर्ष अगदी शिगेला पोहचला आहे. 2025 या वर्षात 47 स्थानिक ग्रामस्थ, आदिवासी, शेतकरी यांच्या नरडीचा घोट वाघाने घेतला. एकटया ब्रम्हपुरी वनविभागात 18 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील एका वर्षात 10 वाघांना जेरबंद करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0