स्फोटाने ज्याेतीच्या स्वप्नाचा झाला चुराडा

04 Mar 2026 11:14:46
अनिल कांबळे
नागपूर,
sbl blast घरात अठराविश्व दारिद्र्य. एकुलत्या लेकीवर शिक्षण साेडून काम करण्याची वेळ आली. वयाची 23 वर्षे पूर्ण केल्यामुळे तिच्या लग्नाचा विचार वृद्ध आईवडील करीत हाेते. पण नियतीने डाव साधला. एसबीएलमध्ये झालेल्या स्फोटात मुलीचा चेहरा, पाेट, छाती आणि हात-पाय भाजले. चेहरा विद्रूप झाल्यामुळे तिच्या डाेक्यावर अक्षदा टाकण्याचे स्वप्न हवेत विरले. ज्याेतीच्याही स्वप्नांचा चुराडा झाला. सामू धुर्वे हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजी पंत) या गावचे. ज्याेती (23) आणि अजय (18) अशी दाेन काबाडकष्ट करणाऱ्या मुलांसह गरिबीत संसार सुरु हाेता.
 
 


ज्योती  
 
 
 
सामू (65) हे पत्नीसह शेतमजुरीला जात हाेते. ज्याेती बी.ए. द्वितीय वर्षाला शिकत असताना घरातील हालाखीच्या स्थितीमुळे तिला शिक्षण साेडावे लागले. राऊळगावातील एसबीएल कंपनीत काम करण्याची संधी ज्याेतीला मिळाली आणि घराला हातभार लागेल या विचाराने तिने हाे काम स्वीकारले. खाेली भाड्याने घेऊन ती कंपनीत कामाला जात हाेती. आईवडिलांना आर्थिक मदत करून आपल्या कुटुंबाचा गाडा ज्याेती हाकत हाेती. वयाचे 23 वर्षे गाठलेल्या ज्याेतीच्या लग्नाबाबत नातेवाईकांमधून विचारणा हाेत असल्यामुळे पालक चिंतेत हाेते. या वर्षी ज्याेतीचे लग्न आटाेपून टाकण्याचे त्यांनी ठरविले हाेते. पण सासरी निघून जाण्यापूर्वी डाेक्यावर छत बनवावे, अशी ज्याेतीची इच्छा हाेती. त्यामुळे ती पै-पै साठवून नव्या घराचे स्वप्न बघत हाेती तर तिचे आईवडिल तिच्या लग्नासाठी स्थळ बघत हाेते.
चेहरा विद्रूप अन् हात-पाय भाजले
सुंदर दिसणाऱ्या ज्याेतीचा या स्फोटात चेहरा भाजून विद्रूप झाला. तर हातापायाचे मांस अर्धवट गळालेले आहे. भाजल्याने छाती आणि पाेटालाही गंभीर जखमा झाल्या.sbl blast अशा स्थितीत माझ्या मुलीच्या लग्नाचा विचार कसा करू, आता तिच्या डाेक्यावर अक्षदा टाकण्याचे स्वप्न अधुरेच राहणार, असा आर्त टाहाे सामू धुर्वे यांनी फोडला. मुलीच्या आनंदावर विरजण पडल्याची खंत त्यांनी बाेलून दाखवत सुखी संसार थाटण्याच्या तिच्या स्वप्नांनाही ग्रहण लागले.
काळजात हाेते धस्स...
आम्हाला सुख मिळावे, म्हणून मुलगी एवढा धाेका पत्करुन नाेकरी करीत हाेती. तिचा चेहरा बघताच काळजात धस्स हाेते. मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचे स्वप्न हाेते, पण हलाखीच्या स्थितीमुळे ते शक्य झाले नाही. या आघातातून माझी मुलगी लवकर बरी व्हावी, आम्ही आयुष्यभर तिला जपू. आमच्या सुखासाठी अंगाचा काेळसा करणाऱ्या मुलीचे ऋण पित्याच्या खांद्यावर कायमस्वरुपी असेल. पुन्हा तिला कामावर पाठविण्याचा विचार जरी डाेक्यात आला तर हृदयाचे ठाेके चुकतात, अशी स्थिती झाली आहे, अशी प्रतिक्रिया ज्याेतीचे वडिल समू धुर्वे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0